Shefali Jariwala Passes Away
मुंबई : कांटा लगा या रिमिक्स गाण्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री, मॉडेल शेफाली जरीवालाचे शुक्रवारी रात्री निधन झाले. ती 42 वर्षांची होती. रात्री उशिरा शेफालीची प्रकृती खालावली आणि तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच तिची प्राणज्योत मालवली. तिच्या पश्चात पती पराग त्यागी आणि नातेवाईक असा परिवार आहे.
शुक्रवारी रात्री शेफाली जरीवालाला ह्रदयविकाराचा झटका आला. तिचा पती पराग त्यागी आणि त्याचे तीन मित्र शेफालीला घेऊन खासगी रुग्णालयात पोहोचले. मात्र, तोवर तिची प्राणज्योत मालवली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी शेफालीच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. रात्री अकराच्या सुमारास शेफालीला ह्रदविकाराचा झटका आल्याचे सिने पत्रकार विकी लालवानी यांनी इन्स्टाग्राममधील पोस्टमध्ये म्हटले आहे. शवविच्छेदनासाठी तिचा मृतदेह कुपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
शेफालीच्या निधनानंतर सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. गायक मिका सिंगने शेफालीच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे, असं म्हणत श्रद्धांजली अर्पण केली. अभिनेत्री स्नेहा उल्लालनेही हे धक्कादायक आहे, या वर्षी काय काय घडतंय असं म्हटलंय. तर भोजपूरी अभिनेत्री मोनालिसानेही शेफालीच्या निधनाच्या पोस्टवर 'काय, हे कधी घडलं, कसं घडलं? अशी प्रतिक्रिया दिली आहे.
कोण होती शेफाली जरीवाला?
शेफाली जरीवाला ही मूळची गुजरातच्या अहमदाबादची होती. 15 डिसेंबर 1982 रोजी तिचा जन्म झाला. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना शेफाली महाविद्यालयाबाहेर थांबली होती. यादरम्यान एका दिग्दर्शकाने तिला बघितले आणि काटा लगा या रिमिक्स गाण्याची ऑफर दिली. 2002 मध्ये कांटा लगा हे रिमिक्स गाणं आलं आणि अवघ्या काही दिवसांमध्ये शेफाली जरीवाला हे नाव घरोघरी पोहोचलं. शेफालीने वयाच्या 19 व्या वर्षी हे गाणं केलं होतं. यानंतर शेफाली प्रकृतीच्या कारणास्तव, वैयक्तिक आयुष्यात चढउतार यामुळे सिनेसृष्टीपासून लांब राहिली.
बिग बॉस सिझन 13, नच बलिये 5 अशा रिएलिटी शोमध्येही तिने सहभाग घेतला होता. 2014 मध्ये शेफालीने पराग त्यागी या अभिनेत्यासोबत लग्न केले. मध्यंतरी एका मुलाखतीत शेफालीने मुल दत्तक घेण्याबाबतही भाष्य केले होते. 'माझ्या आणि परागच्या वयात सात वर्षांचा अंतर आहे. आम्हाला मूल नाही. आम्ही मूल दत्तक घेण्याचा प्रयत्नही केला पण भारतात ही प्रक्रिया खूप किचकट आहे, असे तिने सांगितले होते.
शेफालीने 2004 मध्ये हरमित सिंगशी लग्न केले होते. मात्र, 2009 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. 'घटस्फोटामुळे माझ्या आयुष्यात बदल झाले. तुम्ही कमी वयात लग्न करता आणि घटस्फोटही होतो. याचा परिणाम म्हणजे माझा प्रेमावरचा विश्वास उडाला होता. या कठीण काळात माझ्या कुटुंबाने, मित्राने साथ दिली', असे तिने चार वर्षांपूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते. शेफालीने दुसरे लग्न पराग त्यागीशी केले.