‘बिग बॉस मराठी’मधून घराघरात पोहोचलेली रशियन मॉडेल आणि अभिनेत्री इरिना रुडाकोव्हा हिने मुंबईतील एका कथित ‘रोड रेज’च्या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. एका कारचालकाने रिक्षाचालकाशी गैरवर्तन करत त्याला शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर इरिनाने थेट या प्रकारावर आवाज उठवत मुंबई पोलिसांकडे मदतीची मागणी केली.
इरिनाने सोशल मीडिया पोस्टद्वारे या घटनेचा व्हिडिओ शेअर केला. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या फॉलोअर्सना तो रीपोस्ट करण्याचे आवाहन केले. संबंधित व्यक्तीविरोधात योग्य ती कारवाई व्हावी, यासाठी पोलिसांची मदत मिळावी, अशी अपेक्षाही तिने व्यक्त केली.
नेमकं व्हिडिओमध्ये काय दिसतं?
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती कारमधून खाली उतरल्याचे दिसते. त्यानंतर तो रिक्षाचालकाजवळ जात त्याची कॉलर पकडतो. यावेळी तो रिक्षाचालकाला शिवीगाळ करत धमकावत असल्याचे व्हिडिओत दिसून येते. दुसरीकडे, रिक्षाचालक वारंवार माफी मागताना दिसत आहे. आपल्याला कार दिसली नसल्याचे तो सांगत असल्याचेही व्हिडिओमध्ये ऐकू येते. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावरही या वर्तनाबाबत नाराजी व्यक्त होत आहे.
‘गाडीला स्क्रॅचही नव्हता, मग एवढा आक्रमकपणा कशासाठी?’
इरिनाने या घटनेवर प्रतिक्रिया देताना कारला कोणत्याही प्रकारचा स्क्रॅच लागला नसल्याचा दावा केला. मग रिक्षाचालकाशी अशा प्रकारे आक्रमक वर्तन करण्याची गरज काय होती, असा सवाल तिने उपस्थित केला. तिच्या म्हणण्यानुसार, या घटनेत कारचालकाकडूनच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन झाले होते. मात्र, त्यानंतर त्याने आपला राग रिक्षाचालकावर काढल्याचे इरिनाने म्हटले आहे. इरिनाने या प्रकाराला पूर्णपणे चुकीचे ठरवत मुंबईतील अशा आक्रमक वर्तनाला आळा घालण्याची गरज असल्याचे सांगितले.
‘कुणालाही दुसऱ्यावर हात उचलण्याचा अधिकार नाही’
इरिनाने आपल्या पोस्टमधून स्पष्टपणे सांगितले की, कोणत्याही कारणावरून दुसऱ्या व्यक्तीविरोधात शारीरिक बळाचा वापर करण्याचा अधिकार कुणालाही नाही. रस्त्यावर एखादा वाद झाला तरी तो संवादातून किंवा कायदेशीर मार्गाने सोडवला पाहिजे, असा तिच्या प्रतिक्रियेचा सूर आहे.
‘मुंबईतील हे वर्तन थांबले पाहिजे’, असे म्हणत इरिनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहण्याचे आवाहन केले. या घटनेतील संबंधित व्यक्तीवर कारवाई व्हावी, यासाठी इरिनाने पोलिसांशी संबंधित व्यक्तींना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. तसेच आपल्या फॉलोअर्सनी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून या प्रकरणाला पाठिंबा द्यावा, असेही तिने म्हटले आहे.