मनोरंजन

रवींद्र नाट्यमंदिरात पुन्हा रंगणार ‘पु. ल. कट्टा’

अनुराधा कोरवी

मुंबई; पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्रातील नवोदित कलाकारांना मुंबईत हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या वतीने सुरू करण्यात आलेला "पु. ल. कट्टा " हा उपक्रम पुन्हा एकदा सुरू होत आहे. पु. ल. देशपांडे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून रविवारी (दि.१२ जून) रोजी सायंकाळी ४.३० वाजता रवींद्र नाट्य मंदिराच्या प्रांगणात "प्रयोगशाळा" प्रस्तुत "पुरुषोत्तम" या कार्यक्रमाने या उपक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर कल्पांगण सांस्कृतिक केंद्र प्रस्तुत "जावे पु. लं च्या गावा " हा कार्यक्रम सादर होईल.

राज्यभरातील उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहन मिळावे, तसेच सादरीकरणासाठी हक्काची जागा मिळावी या उद्देशाने ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त २०१८ मध्ये 'पु. ल. कट्टा' या विशेष उपक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. परंतु, कोरोनाकाळात हा उपक्रम होऊ शकला नाही.

सध्या रंगभूमीला चालना मिळत असताना नवोदित कलाकारही व्यासपीठापासून फार काळ वंचित राहू नये म्हणून पुन्हा एकदा "पु. ल. कट्टा" सुरू करण्याचा निर्णय अकादमीने घेतला आहे. पु. ल. देशपांडे यांच्या २२ व्या स्मृतिदिनी म्हणजेच, रविवारी १२ जून रोजी सायंकाळी ४.३० वाजता पु. ल. कट्ट्यावर 'प्रयोगशाळा' प्रस्तुत 'पुरुषोत्तम' या प्रयोगाचे सादरीकरण होणार आहे. पुलंच्या अपरिचित साहित्याला आणि त्यांच्या व्यक्तीमत्त्वातील अपरिचित छटांना रसिकांसमोर आणणारा हा प्रयोग आहे.

यामध्ये केवळ पुलंचे अपरिचित साहित्यच नव्हे तर, पुलंनी लिहिलेली पत्रे, पुलंना काही दिग्गजांनी लिहिलेली पत्रे, लेख, उतारे यांचे भावस्पर्शी अभिवाचन तक्षिल खानविलकर, मल्हार शितोळे आणि सुमेध समर्थ हे तीन कलाकार करणार आहेत. तसेच कल्पांगण सांस्कृतिक केंद्र प्रस्तुत 'जावे पु. लं च्या गावा ' हा पु. लंच्या साहित्यावर आधारित नृत्यनाट्य रंगाविष्कार सादर होणार आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT