पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील आठवड्यात 'रेड २' आणि 'द भूतनी' या बॉलिवूड चित्रपटांसोबतच, 'हिट ३' आणि 'रेट्रो' हे दोन दक्षिण भारतीय चित्रपटही चित्रपटगृहात दाखल झाले. चौथ्या दिवशी म्हणजेच विकेंडला दोन्ही चित्रपटांनी किती कमाई केली हे माहिती आहे का? चला तर मग जाणून घेऊया विकेंडला या चित्रपटांचा परफॉर्मन्स कसा झाला.
१ मे रोजी चित्रपटगृहात एकाच वेळी चार चित्रपट प्रदर्शित झाले. यामध्ये दोन बॉलिवूड तर दोन साऊथच्या चित्रपटांचा समावेश होता. सध्या 'रेड २' हा बॉलिवूड चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकत आहे. तर, 'द भूतनी' चा प्रवास चित्रपटगृहात संपताना दिसत आहे. साऊथ चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास नानीच्या 'हिट ३' ची सुरुवात चांगली झाली. सूर्याच्या 'रेट्रो'नेही पहिल्या दिवशी चांगली कमाई केली.पण विकेंडची आकडेवारी पाहता या दोन्ही चित्रपटांच्या कमाईत घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
नानी आणि श्रीनिधी शेट्टी स्टारर 'हिट ३' हा फ्रँचायझीचा तिसरा भाग आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने धमाकेदार सुरुवात केली आणि पहिल्याच दिवशी २१ कोटी रुपये कमावले. दुसऱ्या दिवशीच त्याच्या कमाईत मोठी घसरण झाली आणि पहिल्या दिवसाच्या तुलनेत कलेक्शन फक्त निम्मे झाले. 'हिट ३' ने दुसऱ्या दिवशी १०.५ कोटी रुपये कमावले.
शनिवारी, तिसऱ्या दिवशी, 'हिट ३' ने १०.४ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. त्याच वेळी, रविवारी चित्रपटाच्या कमाईत आणखी घट झाली आहे. या चित्रपटाला विकेंडचा फायदा मिळाला नाही. चौथ्या दिवशी, त्याने फक्त ७.६७ कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटाचा एकूण व्यवसाय ४९.५७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच चित्रपटाला चार दिवसांत ५० कोटी रुपयेही कमाई करता आलेले नाही.
सूर्या, पूजा हेगडे आणि प्रकाश राज यांच्या 'रेट्रो' चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाच्या कमाईबाबत बोलायचे झाले तर, पहिल्या दिवशी १९.२५ कोटी रुपये कमावले. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने ७.७५ कोटी रुपये कमावले. शनिवारी तिसऱ्या दिवसाचे कलेक्शन ८ कोटी रुपये होते. चौथ्या दिवशी, रविवारी, चित्रपटाचे कलेक्शन ६.९६ कोटी रुपये होते. 'रेट्रो' चित्रपटाचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन फक्त ४१.९६ कोटी रुपये इतकेच झाले.