AI-generated image 
मनोरंजन

Film Screenwriters | भारतातील 74% पटकथा लेखकांना मिळतंय कमी मानधन, 41% जणांनी दिली AI चा वापर केल्याची कबुली!

Film Screenwriters | AI मुळे निर्मात्यांच्या नजरेत माणसाच्या कल्पकतेची किंमत होतीय कमी

पुढारी वृत्तसेवा

'टल्सी' आणि 'ऑरमॅक्स मीडिया' यांनी 'द राईट ड्राफ्ट: २०२६' या सर्वेक्षणाची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध केली आहे. यामध्ये २५४ लेखकांनी आपले अनुभव मांडले आहेत.

Film Screenwriters The Right Draft 2026

मुंबई : चित्रपट, ओटीटी (OTT) असो की टीव्हीवरील मनोरंजन या साऱ्यांचा पाया हा उत्तम 'कथा' हाच असतो. लेखक असो की पटकथालेखन, आपल्या शब्दांच्या ताकदीवर मनोरंजनाचे विश्व घडवत असतो. मात्र मागील काही वर्षांपासून भारतातील पटकथालेखक सध्या मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. कारण प्रत्यक्ष लेखकांना खूप कमी मानधन दिले जात असल्याचे वास्तव 'द राईट ड्राफ्ट' या रिपोर्टमधून समोर आले आहे.

'द राईट ड्राफ्ट' सर्वेक्षणात २५४ लेखकांनी घेतला भाग

'द हॉलिवूड रिपोर्टर'ने दिलेल्‍या वृत्तानुसार, 'टल्सी' आणि 'ऑरमॅक्स मीडिया' यांनी 'द राईट ड्राफ्ट: २०२६' या सर्वेक्षणाची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध केली आहे. यामध्ये २५४ लेखकांनी आपले अनुभव मांडले आहेत. यामध्ये प्रामुख्याने दोन गोष्टी समोर आल्या आहेत. पहिली म्हणजे चित्रपट आणि टीव्ही मालिकांच्या जगात आजही लेखकांना योग्य मानधन (वेतन) आणि कामाचे क्रेडिट (नाव) मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. तसेच सध्या कामाच्या पद्धतीत AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) मुळे मोठे बदल होत आहेत, तरीही लेखकांच्या मूळ समस्या कायम राहिल्या आहेत.

चारपैकी तीन लेखक म्हणतात, योग्य मोबदला मिळत नाही

सर्वेक्षणात सहभागी झालेल्या दर ४ पैकी ३ लेखकांनी (सुमारे ७४ टक्के) असे स्पष्ट केले की त्यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळत नाही. मागील सर्वेक्षणात ही टक्केवारी ६३ होती, आता ती ७४ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. तर निम्म्याहून अधिक लेखकांनी सांगितले की त्यांना वेळेवर पैसे मिळत नाहीत. हे प्रमाण ४० टक्क्यांवरून आता ५० टक्क्यांच्या पुढे गेले आहे. ७८ टक्के लेखकांना त्यांचे हक्काचे पैसे (थकबाकी) मिळवण्यासाठी वारंवार पाठपुरावा करावा लागतो किंवा मागणी करावी लागते, असेही स्पष्ट झाले आहे.

अब्जावधीची उलाढाल होत असताना लेखकाचा वाटा खूप कमी वाटा

आजकाल चित्रपट, वेब सिरीज आणि सोशल मीडियासाठी खूप मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. जगभरात भारतीय कथांची चर्चा होत आहे, पण दुर्दैवाने या मोठ्या उलाढालीत ज्याने कथा लिहिली, त्या लेखकाच्या वाट्याला मात्र खूप कमी वाटा येत असल्याचा मोठा विरोधाभास या सर्वेक्षणामुळे समोर आला आहे.

पैसे कमी, कामाचे योग्य श्रेयही दिले जात नाही

एकीकडे चित्रपट, टीव्ही आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर पैशासाठी संघर्ष करावा लागत असतानाच आपल्या कामाचे योग्य श्रेय (नाव) दिले जात नाही, अशी भावना सर्वेक्षणात सहभागी झालेल्या निम्म्याहून अधिक लेखकांनी व्यक्त केली. ६४ टक्के लेखकांच्या मते, निर्माते किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मकडे नाव देण्याबाबत (क्रेडिट देण्यासाठी) कोणतेही ठराविक नियम (प्रोटोकॉल) नाहीत. ज्याला जसे वाटेल तसे नाव दिले जाते. अनेक लेखकांनी असा आरोप केला आहे की, चित्रपट ही "सर्वांची मिळून केलेली कला" आहे असे गोंडस नाव देऊन दिग्दर्शक आणि निर्माते लेखकाचे श्रेय स्वतः लाटतात किंवा ते नाकारतात.

मनोरंजन विश्वावर 'स्टार पॉवर'चे वर्चस्व

फक्त सहा टक्के लेखकांना वाटते की, पटकथा या चित्रपट स्टार्स कलाकारांपेक्षा जास्त महत्त्वाच्या असतात, तर ८३ टक्के लेखकांनी स्‍पष्‍ट केले की, स्टार पॉवरचेचे वर्चस्व चालते. एकेकाळी लेखकाचे माध्यम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'ओटीटी' प्‍लॅटफॉर्ममध्‍ये आता हा बदल दिसू लागला आहे. पटकथांना प्राधान्य दिले जाते असे वाटणाऱ्या लेखकांचे प्रमाण २०२३ मध्ये ७६ टक्के होते ते आता ६२ टक्क्यांपर्यंत घसरले आहे.

फक्त १९ टक्के जणांना 'अर्थपूर्ण' मार्गदर्शन

फक्त १९ टक्के लेखकांना अर्थपूर्ण मार्गदर्शनाची सुविधा आहे. तीन वर्षांपूर्वी ही टक्‍केवारी ३० टक्के होती. सर्वेक्षणात सहभागी झालेल्‍या ७६ टक्के लेखकांनी म्‍हटलं आहे की, त्यांची कला विकसित करण्यासाठी त्‍यांच्‍याकडे पुरेशा पायाभूत सुविधा नाही. फक्त ३८ टक्केलेखकांनी सांगितले की, त्‍यांच्‍याकडे प्रभावी तक्रार निवारणाची सुविधा आहे.

सुमारे ४१ टक्के लेखकांनी वापरलेले एआय टूल्स

जवळपास ४१ टक्के लेखक आता त्यांच्या कामात कधी ना कधी AI टूल्सचा वापर करत आहेत. विशेष म्हणजे, सर्वेक्षणात सहभागी झालेल्‍या निम्‍म्‍याहून अधिक लेखकांना वाटतं की हे तंत्रज्ञान त्यांच्यासाठी धोकादायक नाही. तंत्रज्ञान चांगलं असलं, तरी त्यावरून होणारी कमाई मात्र धोक्यात आहे. तर ६८ टक्के लेखकांना असं वाटतं की, AI मुळे निर्मात्यांच्या नजरेत माणसाच्या कल्पकतेची किंमत कमी होत चालली आहे. निर्मात्यांना आता असं वाटतं की लेखक AI वापरत आहेत, त्यामुळे त्यांनी खूप कमी वेळात काम पूर्ण करून द्यावं, अशी अपेक्षा निर्माते ठेवू लागल्‍याचे मत ५० टक्के लेखकांनी व्‍यक्‍त केले आहे.

सर्वेक्षणाचा उद्देश केवळ चर्चा नव्हे : चैतन्‍य हेगडे

तुलसी संस्थेचे सह-संस्थापक चैतन्य हेगडे यांनी या रिपोर्टबाबत म्हटले आहे की, या सर्वेक्षणाचा मुख्‍य उद्देश हा केवळ चर्चा न करता, लेखकांना वास्‍तवात कोणत्या समस्या भेडसावत आहेत (उदा. पगार, नाव मिळणे, कामावर मिळणारा अभिप्राय आणि AI चा वापर) हे मनोरंजन उद्योगाला समजावून सांगणे हा आहे. डेटावरून असे दिसते की, मनोरंजन उद्योगात काही बदल होत आहेत; पण लेखकांना मिळणारे कमी मानधन ही समस्‍या आहे तशीच आहे. लेखकांच्या तक्रारींकडे केवळ 'मत' म्हणून न पाहता, त्या सोडवण्यासाठी एक ठराविक व्‍यवस्‍था तयार व्हायला हवी. ही संपूर्ण व्यवस्था अधिक पारदर्शक, न्याय्य आणि लेखकांसाठी पोषक असावी, अशी अपेक्षाही हेगडे यांनी व्यक्त केली आहे.

अडचणी संपूर्ण मनोरंजन सृष्टीच्या कामाच्या पद्धतीत : शैलेश कपूर

ऑरमॅक्स मीडियाचे संस्थापक आणि सीईओ शैलेश कपूर यांनी लेखकांच्या समस्यांवर प्रकाश टाकताना खालील मते मांडली आहेत: लेखकांच्या समस्या या केवळ अधूनमधून येणाऱ्या अडचणी नसून त्या संपूर्ण मनोरंजन सृष्टीच्या कामाच्या पद्धतीत (System) खोलवर रुजलेल्या आहेत. कथा सांगण्याच्या प्रक्रियेत लेखक हा सर्वात महत्त्वाचा (कणा) असतो, पण दुर्दैवाने त्यालाच सर्वात जास्त संघर्षाचा सामना करावा लागत आहे. 'द राईट ड्राफ्ट' या अहवालाचा उद्देश लेखकांच्या मनातील भावना आणि त्यांच्या तक्रारी मोजणे हा आहे. या माहितीचा वापर करून उद्योगात सुधारणा कशी करता येईल, लेखकांना त्यांच्या कामाची जबाबदारी आणि मालकी हक्क कसे मिळवून देता येतील, यासाठी हा अहवाल उपयुक्त ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT