

पुणे: पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) यावर्षी महिला दिग्दर्शकांची खूप मोठी संख्या असून, १३० चित्रपटांपैकी ४५ महिला दिग्दर्शकांचे चित्रपट महोत्सवात पाहायला मिळणार आहेत. जागतिक चित्रपट स्पर्धा, ग्लोबल सिनेमा, भारतीय चित्रपट आणि माहितीपट अशा विविध विभागांतील चित्रपटांचा समावेश आहे.
महोत्सवाच्या जागतिक चित्रपट स्पर्धा विभागात सहा महिला दिग्दर्शिकांचे चित्रपट दाखवले जाणार आहेत. बेल्जियमच्या दिग्दर्शिका आणि पटकथा लेखिका लॉरा वँडेल यांचा 'अॅडम्स सेक', कॅनेडियन दिग्दर्शिका सोफी रोमवारी यांचा 'ब्लू हेरॉन', फ्रेंच दिग्दर्शिका पॉलीन लोक्वेस यांचा 'निनो', हंगेरीच्या दिग्दर्शिका इल्डिको एन्येदी यांचा 'सायलेंट फ्रेंड', ऑस्ट्रियन दिग्दर्शिका एल्सा क्रेम्सर यांचा 'व्हाइट स्नेल', 'धीस इज माय नाईट' हे चित्रपट पाहायला मिळणार आहेत. ग्लोबल सिनेमा विभागात महिला दिग्दर्शिकांच्या २९ चित्रपटांची निवड झाली आहे. त्यात 'लूझ' (फ्लोरा लाऊ), 'पिंच' (उत्तरा सिंग), 'कारवाँ' (झुजाना किचनेरोव्हा), 'नो वे बॅक' (नथाली नाजेम) आणि 'साउंड ऑफ फॉलिंग' (माशा शिलिन्स्की) यांसारखे चित्रपट वास्तविक घटना, कौटुंबिक नाती, सामाजिक तणाव आणि वैयक्तिक स्वातंत्र्य या विषयांना स्पर्श करतात.
आसामच्या दिग्दर्शिका मंजू बोरा यांचा 'मर्डर्स टू क्लोज- लव्ह टू फार' हा भारत-इस्रायल सहनिर्मितीतील चित्रपट, प्रेमसंबंध, हत्या आणि राजकीय संघर्ष यांवर आधारित आहे. हा चित्रपट मंजू बोरा आणि इस्रायलचे दिग्दर्शक डॅन वोलमन यांनी संयुक्तपणे दिग्दर्शित केला असून, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने (एनएफडीसी) या चित्रपटाला पाठबळ दिले आहे.
महाराष्ट्रातील दिग्दर्शिका ईशा पुंगलिया यांचा 'ओस्लो : अ टेल ऑफ प्रॉमिस' हा माहितीपट, तर जिजीविशा काळे यांचा 'मदरहूड-तिघी' हा चित्रपट मराठी चित्रपट स्पर्धा विभागातून निवडण्यात आला आहे. “यावर्षी पिफमध्ये महिला दिग्दर्शकांची संख्या वाढणे ही अत्यंत सकारात्मक बाब आहे. भारतीय चित्रपट विभागात दिग्दर्शिका शिवरंजिनी जे. यांचा मल्याळम चित्रपट 'व्हिक्टोरिया' दाखवला जाणार आहे. याच विभागात तनुश्री दास यांनी सह-दिग्दर्शित केलेला 'शॅडोबॉक्स' हा बंगाली भाषेतील नाट्यपट असून, त्यांचे हे दिग्दर्शकीय पदार्पण आहे.
महिला दिग्दर्शकांची संख्या वाढते ही आनंदाची बाब
“चित्रपट क्षेत्रात महिला दिग्दर्शकांची संख्या वाढत आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. येत्या काळात आणि पुढील वर्षांत ही संख्या अधिक वाढेल, अशी मला आशा आहे,” असे पिंच चित्रपटाच्या दिग्दर्शिका उत्तरा सिंग यांनी सांगितले, तर मराठी चित्रपटसृष्टीत महिलांची सर्जनशील उपस्थिती वाढणे गरजेचे आहे. भविष्यात विविध महिला कलाकार आणि तांत्रिक सहकाऱ्यांसोबत एकत्रितपणे काम करण्याची माझी इच्छा आहे,” असे तिघी चित्रपटाच्या दिग्दर्शिका जिजीविशा काळे यांनी सांगितले.