Dhurandhar 2 Ending Explained Hamza Part 3: रणवीर सिंगचा बहुचर्चित ‘धुरंधर 2’ (धुरंधर: द रिवेंज) चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आता त्याच्या क्लायमॅक्सबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे. चित्रपटाच्या शेवटी नेमकं काय घडलं आणि पुढे ‘पार्ट 3’ येणार का, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये रणवीर सिंगचा हमजा अली मझारी उर्फ जसकीरत सिंह रंगी हा पाकिस्तानमधील मुरिदके येथे पोहोचतो. तिथे त्याची मेजर इकबालशी थेट भिडंत होते. बलोच लढवय्यांच्या मदतीने तो LeT चा कॅम्प जमीनदोस्त करतो. मात्र, या कारवाईनंतर पाकिस्तानी सैन्य त्याला अटक करतं आणि त्याच्यावर अत्याचार करतं. यावेळी त्याची खरी ओळख भारतीय गुप्तहेर असल्याचं उघड होतं.
यानंतर कथेत मोठा ट्विस्ट येतो. आर. माधवनने साकारलेला अजय सान्याल हा एका वरिष्ठ पाकिस्तानी अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करून हमजाची सुटका करतो. पण इथेच कथा अधिक रंजक बनते. जमील जमाली नावाचा एक ज्येष्ठ पाकिस्तानी राजकारणी, जो अनेक वर्षांपासून पाकिस्तानमध्ये आहे, तो प्रत्यक्षात भारतीय एजंट असल्याचं उघड होतं. तो हमजाला भारतात परत येण्यासाठी मदत करतो.
चित्रपटाच्या शेवटी हमजा भारतात परततो, सान्यालला भेटतो आणि आपल्या पंजाबमधील गावात पोहोचतो. अनेक वर्षांनंतर तो आपल्या कुटुंबाला पाहतो. मात्र, चित्रपटाचा शेवटी सपेन्स ठेवण्यात आला आहे. तो खरोखरच कुटुंबासोबत राहणार की पुन्हा गुप्तहेर म्हणून नवीन मिशनवर जाणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता कायम आहे. शेवटच्या दृश्यात रणवीरचा कॅमेऱ्याकडे पाहण्याचा अंदाजही अनेक प्रश्न निर्माण करतो.
चित्रपट इथेच संपत नाही. एंड-क्रेडिट्सनंतर दोन वेगळे सीन दाखवले आहेत. पहिल्या सीनमध्ये हमजाच्या ट्रेनिंगचा प्रवास दाखवला आहे. यात तो कॉम्बॅट, विविध भाषा, धर्मग्रंथांचा अभ्यास आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्याचं प्रशिक्षण घेताना दिसतो. दुसऱ्या सीनमध्ये पाकिस्तानी जनरल शाहनवाज संतापलेला दाखवला आहे, ज्यामुळे कथा पुढे काय वळण घेईल याची थोडी झलक मिळते.
मात्र, या दोन्ही पोस्ट-क्रेडिट सीनमध्ये ‘धुरंधर 3’ बाबत कोणताही मेसेज देण्यात आलेला नाही. त्यामुळे पुढील भाग येणार का, याबाबत अजूनही अनिश्चितता कायम आहे. एकंदरीत, ‘धुरंधर 2’ चा शेवट प्रेक्षकांना विचार करायला लावणारा आणि पुढील कथेबद्दल उत्सुकता वाढवणारा आहे.