Dhadkan 2  Pudhari
मनोरंजन

Dhadkan 2: २६ वर्षांनंतर ‘धडकन २’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला? अक्षय-शिल्पा चित्रपटातून बाहेर, सुनील शेट्टीच्या कॅमिओची चर्चा

Dhadkan 2: चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची तयारी सुरू असल्याचे वृत्त आहे. मात्र, निर्मात्यांनी अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.

Rahul Shelke

Dhadkan 2: बॉलिवूडमधील गाजलेल्या चित्रपटांचे सीक्वल बनवण्याचा सध्या ट्रेंड सुरू आहे. अशातच अभिनेता अक्षय कुमार, शिल्पा शेट्टी आणि सुनील शेट्टी यांच्या ‘धडकन’ चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची चर्चा रंगू लागली आहे. २००० मध्ये प्रदर्शित झालेल्या या रोमँटिक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले होते.

चित्रपटातील गाणी, संवाद आणि कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आजही स्थान निर्माण केले आहे. आता तब्बल २६ वर्षांनंतर ‘धडकन २’ बनवण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

मिड-डेने दिलेल्या वृत्तानुसार, निर्माते ‘धडकन’च्या दुसऱ्या भागावर काम करत आहेत. मात्र, यावेळी चित्रपटात जुन्या कलाकारांची जोडी पाहायला मिळणार नाही. अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी यांना या सीक्वलमध्ये स्थान मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या जागी नव्या कलाकारांना संधी देण्याची निर्मात्यांची योजना आहे.

‘धडकन २’मध्ये सुनील शेट्टीची एन्ट्री होणार?

‘धडकन’ चित्रपटात देव ही भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या सुनील शेट्टीच्या चाहत्यांसाठी मात्र आनंदाची बातमी आहे. या नव्या चित्रपटात सुनील शेट्टीची पुन्हा एकदा झलक पाहायला मिळू शकते.

मिड-डेच्या वृत्तानुसार, सुनील शेट्टी यांना ‘धडकन २’मध्ये एका खास कॅमिओ भूमिकेसाठी विचारणा करण्यात आली आहे. म्हणजेच चित्रपटात त्यांची भूमिका मर्यादित असली, तरी त्यांच्या उपस्थितीमुळे जुन्या चाहत्यांना सरप्राइज मिळू शकते.

या चित्रपटाची कथा आजच्या काळातील प्रेमसंबंध, नात्यांमधील गुंतागुंत आणि प्रेमभंग अशा विषयांभोवती फिरणार असल्याचे समजते. त्यामुळे नव्या प्रेमकथेच्या माध्यमातून ‘धडकन’चा वारसा पुढे नेण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न असू शकतो.

दिग्दर्शनाची जबाबदारी कोणाकडे जाणार?

पहिल्या ‘धडकन’ चित्रपटाचे दिग्दर्शन धर्मेश दर्शन यांनी केले होते. मात्र, दुसऱ्या भागासाठी दिग्दर्शक बदलण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’ आणि ‘बत्ती गुल मीटर चालू’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे श्री नारायण सिंह यांच्याकडे ‘धडकन २’च्या दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. याबाबत निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यात प्राथमिक चर्चा सुरू असल्याचे वृत्त आहे.

‘धडकन २’चे काम सुरुवातीच्या टप्प्यात

सध्या ‘धडकन २’ चित्रपटाचे काम सुरुवातीच्या टप्प्यात आहे. चित्रपटाची पटकथा आणि पूर्वतयारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मुख्य भूमिकांसाठी नव्या कलाकारांचा शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप कोणत्याही कलाकाराच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला नाही.

विशेष म्हणजे, निर्मात्यांकडूनही या चित्रपटाबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे चित्रपटाची कथा, कलाकार आणि प्रदर्शनाची तारीख याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

मात्र, ‘धडकन २’ची चर्चा सुरू होताच सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. आता २६ वर्षांपूर्वीच्या लोकप्रिय प्रेमकथेचा नवा भाग प्रेक्षकांना किती आवडतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT