तिबेटी धर्मगुरू दलाई लामा. Pudhri Photo
मनोरंजन

Dalai Lama Grammy Awards | दलाई लामांनी जिंकला ग्रॅमी पुरस्कार! ९० व्या वर्षी कोणत्या श्रेणीत सन्मान? जाणून घ्या सविस्तर

६८ व्या पुरस्कार सोहळा ठरला लक्षवेधी, प्रथमच आध्यात्मिक गुरु ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित

पुढारी वृत्तसेवा

रविवार, १ फेब्रुवारी रोजी झालेल्या प्रतिष्ठित ग्रॅमी पुरस्‍कार सोहळ्यात अध्यात्म आणि पॉप संस्कृतीचा एक अनोखा आणि अर्थपूर्ण संगम पाहायला मिळाला.

Dalai Lama Grammy Awards 2026 | तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांनी वयाच्या ९० व्या वर्षी ग्रॅमी पुरस्कार जिंकला आहे. ६८ व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात त्यांनी पुरस्कारावर आपली मोहोर उमटवत संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. जाणून घेऊया दलाई लामा यांना ग्रॅमी पुरस्कार का आणि कोणत्या श्रेणीत मिळाला याविषयी...

संगीत क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या ग्रॅमी पुरस्कारामुळे जगाचे लक्ष वेधले

९० वर्षीय दलाई लामा यांना त्यांच्या "मेडिटेशन: द रिफ्लेक्शन्स ऑफ हिज होलिनेस द दलाई लामा" या ऑडिओ प्रकल्पासाठी हा सन्मान मिळाला. त्यांना सर्वोत्कृष्ट ऑडिओबुक, कथन आणि कथाकथन रेकॉर्डिंग या श्रेणीत हा पुरस्कार देण्यात आला. ग्रॅमी पुरस्कारांच्या प्री-टेलिकास्ट समारंभादरम्यान हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ही घोषणा ऐतिहासिक ठरली. कारण प्रथमच या श्रेणीतील एखाद्या जगप्रसिद्ध आध्यात्मिक गुरु ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कारण ग्रॅमी पुरस्कार हा एक संगीत पुरस्कार आहे आणि दलाई लामा त्या क्षेत्रातील नाहीत.

दलाई लामा असणार्‍या श्रेणीत स्पर्धा होती तीव्र

दलाई लामांबरोबर होत्या अन्य नामांकित व्यक्ती या श्रेणीतील स्पर्धा तीव्र होती. दलाई लामा यांनी ग्रॅमी पुरस्कारांचे यजमान आणि प्रसिद्ध विनोदी कलाकार ट्रेवर नोआ, अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीश केतनजी ब्राउन जॅक्सन आणि पॉप संगीत गट मिली व्हॅनिलीचे सदस्य फॅब मोरवन यांसारख्या प्रमुख नामांकित व्यक्तींना मागे टाकले. हा विजय त्यांच्या लोकप्रियतेबरोबरच शांतता, करुणा आणि आत्मनिरीक्षण या विषयांना अजूनही जागतिक स्तरावर किती महत्त्व आहे, याची प्रचिती देतो.

कोणत्या अल्‍बमसाठी पुरस्कार?

"मेडिटेशन: द रिफ्लेक्शन्स ऑफ हिज होलिनेस द दलाई लामा" हा एक ऑडिओ आहे. यामध्ये मौखिक ध्यान, दलाई लामा यांच्या शिकवणी आणि संगीताचे सुंदर मिश्रण आहे. या अल्बमचे संगीत हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताने प्रेरित आहे. हे संगीत श्रोत्याला शांती, आत्मनिरीक्षण आणि संतुलनाची भावना देते. हा प्रकल्प केवळ आध्यात्मिक साधना करण्याचे माध्यम म्हणून काम करत नाही, तर आधुनिक जगात मानसिक शांती मिळवणाऱ्यांसाठी एक शक्तिशाली संदेश देखील देतो.

दलाई लामांच्या शिकवणी, अल्बमचा आत्मा

दलाई लामा स्वतः समारंभात उपस्थित नसल्याने, त्यांच्या वतीने हा पुरस्कार प्रसिद्ध गायक-गीतकार रुफस वेनराईट यांनी स्वीकारला. स्टेजवर आल्यावर त्यांनी विनोदाने म्हटले, "बरं, मी स्पष्टपणे दलाई लामा नाहीये," ज्याला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला. त्‍यांनी आयोजकांचे आभार मानले. ज्ञान, चिंतन आणि करुणा यांसारख्या मूल्यांवर आधारित ऑडिओतील सहभागावर आपलं मत व्यक्त केले. दलाई लामा यांच्या शिकवणी हा या अल्बमचा आत्मा आहेत आणि त्यांच्या वतीने ग्रॅमी पुरस्कार स्वीकारणे हा एक अभिमानाचा क्षण असल्‍याचेही वेनराईट यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT