

Dalai Lama : तिबेटी आध्यात्मिक नेते १४ वे दलाई लामा तेन्झिन ग्योत्सो आज ( दि. ६) ९० व्या वर्षात पदार्पण करत आहेत. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी यांनी दलाई लामा यांचा 'प्रेम, करुणा, धैर्य आणि नैतिक शिस्तीचे' प्रतीक म्हणून गौरव केला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर ) एक पोस्ट शेअर करत त्यांनी दलाई लामा यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक्स' पोस्टमध्ये म्हटलं आहे की, परमपूज्य दलाई लामा यांना त्यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी मी १.४ अब्ज भारतीयांसोबत सामील आहे. ते प्रेम, करुणा, संयम आणि नैतिक शिस्तीचे एक चिरस्थायी प्रतीक आहेत. त्यांच्या संदेशाने सर्व धर्मांमध्ये आदर आणि कौतुकाची भावना निर्माण केली आहे. आम्ही त्यांच्या निरंतर आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो.
'दलाई लामा' हा एक मंगोलियन शब्द असून, त्याचा अर्थ 'ज्ञानाचा महासागर' असा होतो. तिबेटी बौद्ध परंपरेनुसार, दलाई लामा हे करुणेचे बोधिसत्व (बुद्धांप्रमाणे जागृत असलेले) यांचे अवतार मानले जातात. अशी मान्यता आहे की, हे लोक इतरांची सेवा करता यावी यासाठी स्वतःचा मोक्ष लांबवतात. दलाई लामा हे तिबेटचे सर्वोच्च धार्मिक आणि अध्यात्मिक नेते आहेत.सन १९५० मध्ये जेव्हा चीनने तिबेटवर आक्रमण केले, तेव्हा दलाई लामा यांना राजकीय जबाबदारी स्वीकारावी लागली. मार्च १९५९ मध्ये तिबेटमधील राष्ट्रीय उठाव चीनने दडपल्यानंतर, दलाई लामा यांना ८० हजारांहून अधिक तिबेटी शरणार्थींसोबत भारतात आश्रय घ्यावा लागला. तेव्हापासून आजपर्यंत दलाई लामा भारतातच वास्तव्यास असून शांतता, प्रेम आणि करुणेचा संदेश जगभरात पोहोचवत आहेत.
दशकांपासून शांतता आणि सहिष्णुतेचा संदेश
दलाई लामा यांना जगभरात शांतता, सहिष्णुता आणि मानवतेचे प्रतीक मानले जाते. ते धर्म, जात आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन मानवतेचा पुरस्कार करतात. भारतात राहूनही त्यांनी कधीही चीनविरोधी राजकारण केले नाही, उलट त्यांनी नेहमीच संवाद आणि शांततेच्या मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या मते, जगाला आज प्रेम, करुणा आणि धैर्याची सर्वाधिक गरज आहे. याच कारणामुळे त्यांना प्रत्येक धर्मात आणि देशात आदराचे स्थान आहे.