Dadasaheb Phalke Awards 2026 Winners Full List Pudhari
मनोरंजन

Dadasaheb Phalke Awards 2026: समय रैना, स्मृती इराणी, आदित्य धर... दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा; कोणाला कोणता पुरस्कार मिळाला?

Dadasaheb Phalke Awards 2026 Winners: दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल पुरस्कार २०२६ ची विजेत्यांची यादी जाहीर झाली असून टेलर स्विफ्ट आणि समय रैनासह अनेक कलाकारांचा गौरव करण्यात आला आहे.

Rahul Shelke

Dadasaheb Phalke Awards 2026 Winners: दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल पुरस्कार २०२६ च्या विजेत्यांची यादी जाहीर झाली आहे. यंदाच्या पुरस्कारांमध्ये हॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंतच्या अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. प्रसिद्ध अमेरिकन गायिका टेलर स्विफ्टला ‘इंटरनॅशनल आर्टिस्ट ऑफ द इयर’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर भारतीय विनोदी कलाकार समय रैनाला ‘कॉमेडियन ऑफ द इयर’ या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

या पुरस्कारांची घोषणा २० नोव्हेंबर रोजी करण्यात आली. या यादीत हॉलिवूड अभिनेता मायकेल बी. जॉर्डन, दिग्दर्शक पॉल थॉमस अँडरसन, जेम्स कॅमेरून यांच्यासह भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांचा समावेश आहे. ज्येष्ठ अभिनेते कमल हासन यांनाही चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले आहे.

‘धुरंधर’ची पुरस्कारांमध्ये बाजी

यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात ‘धुरंधर’ चित्रपटाने विशेष छाप पाडली आहे. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. अभिनेता रणवीर सिंह याला याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला. तसेच चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात आले आहे.

दुसरीकडे, ‘सैयारा’ चित्रपटानेही पुरस्कारांमध्ये बाजी मारली आहे. या चित्रपटातील अभिनेत्री अनीत पड्डा हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. तर ‘सैयारा’ हे वर्षातील सर्वोत्कृष्ट गाणे ठरले आहे. या गाण्यासाठी गायक फहीम अब्दुल्ला यालाही सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

हॉलिवूडमधील दिग्गजांचाही सन्मान

हॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांना जागतिक चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले आहे. अभिनेता मायकेल बी. जॉर्डन याला ‘सिनर्स’ चित्रपटासाठी आंतरराष्ट्रीय चित्रपटातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. तर पॉल थॉमस अँडरसन यांना आंतरराष्ट्रीय चित्रपटातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात आले आहे.

‘अवतार : फायर अँड ॲश’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. संगीत क्षेत्रातील योगदानासाठी ज्येष्ठ संगीतकार इलैयाराजा यांचाही विशेष सन्मान करण्यात आला आहे.

वेब सीरिज आणि टीव्ही कलाकारांचाही गौरव

चित्रपटांबरोबरच वेब सीरिज आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील कलाकारांनाही पुरस्कार जाहीर झाले आहेत. आर्यन खान याला ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या वेब सीरिजसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे. या सीरिजला सर्वोत्कृष्ट वेब सीरिजचा पुरस्कारही जाहीर झाला आहे.

‘पाताल लोक’मधील अभिनयासाठी जयदीप अहलावत याला वेब सीरिजमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. तर ‘दिल्ली क्राइम ३’मधील भूमिकेसाठी शेफाली शाह हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेला वर्षातील सर्वोत्कृष्ट टेलिव्हिजन मालिकेचा पुरस्कार मिळाला आहे.

दादासाहेब फाळके पुरस्कार २०२६ : विजेत्यांची संपूर्ण यादी

  • टेलर स्विफ्ट – सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय कलाकार

  • समय रैना – सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार

  • जेम्स कॅमेरून – जागतिक चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदान

  • मायकेल बी. जॉर्डन – आंतरराष्ट्रीय चित्रपटातील सर्वोत्कृष्ट अभिनेता (सिनर्स)

  • कमल हासन – चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदान

  • स्मृती इराणी – अभिनयातील विशेष कामगिरी (क्योंकि सास भी कभी बहू थी २)

  • आर्यन खान – वेब सीरिजमधील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (द बॅड्स ऑफ बॉलिवूड)

  • पॉल थॉमस अँडरसन – आंतरराष्ट्रीय चित्रपटातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक

  • अक्षय खन्ना – अभिनयातील विशेष कामगिरी (धुरंधर)

  • अवतार: फायर अँड अॅश – सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट

  • तारक मेहता का उल्टा चष्मा – सर्वोत्कृष्ट मालिका

  • धुरंधर – सर्वोत्कृष्ट चित्रपट

  • आदित्य धर, ज्योती देशपांडे आणि लोकेश धर – सर्वोत्कृष्ट निर्माते

  • रणवीर सिंह – सर्वोत्कृष्ट अभिनेता (धुरंधर)

  • अनीत पड्डा – सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (सैयारा)

  • इलैयाराजा – संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान

  • कांतारा : चॅप्टर १ – समीक्षकांच्या पसंतीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट

  • ऋषभ शेट्टी – समीक्षकांच्या पसंतीचा सर्वोत्कृष्ट अभिनेता

  • यामी गौतम धर – समीक्षकांच्या पसंतीची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

  • आदित्य धर – सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक

  • विनीत कुमार सिंह – सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता

  • रितेश देशमुख – विनोदी भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता

  • करण औजला – सर्वोत्कृष्ट कलाकार

  • सैयारा – वर्षातील सर्वोत्कृष्ट गाणे

  • फहीम अब्दुल्ला – सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (सैयारा)

  • द बॅड्स ऑफ बॉलिवूड – सर्वोत्कृष्ट वेब सीरिज

  • जयदीप अहलावत – वेब सीरिजमधील सर्वोत्कृष्ट अभिनेता (पाताल लोक)

  • शेफाली शाह – वेब सीरिजमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (दिल्ली क्राइम ३)

दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक मानले जाते. त्यांच्या नावाने आयोजित करण्यात येणारा दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल हा खासगी स्तरावर आयोजित केला जाणारा चित्रपट महोत्सव आणि पुरस्कार सोहळा आहे.

या माध्यमातून चित्रपट, टेलिव्हिजन, संगीत आणि डिजिटल मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांच्या कामाचा गौरव केला जातो. यंदाच्या पुरस्कारांमध्ये भारतीय कलाकारांसोबत आंतरराष्ट्रीय स्तरावरील कलाकारांचाही समावेश असल्याने या पुरस्काराची चर्चा रंगली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT