Border 2
मुंबई : सन्नी देओलचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'बॉर्डर २' ची चर्चा बॉलिवूडमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. १९९७ मधील सुपरहिट 'बॉर्डर' चित्रपटाच्या या सीक्वलमध्ये सन्नी देओलसोबत वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी दिसणार आहेत. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे चित्रपटाचे सकाळचे शो रद्द करण्यात आले आहेत.
'बॉर्डर २' बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका करू शकतो. ॲडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत चित्रपटाची सुरुवातीची कामगिरी उत्तम राहिली आहे. परंतु, अनेक चित्रपटगृहांमध्ये चित्रपटाचे सकाळचे शो ठेवण्यात आलेले नाहीत. ट्रेड विश्लेषकांनी एक्सवर पोस्ट शेअर करून यामागील कारण तांत्रिक बिघाड असल्याचे सांगितले आहे. बहुतांश चित्रपटगृहांमध्ये चित्रपटाचा पहिला शो सकाळी ९ वाजेनंतर सुरू होत आहे.
'बॉर्डर २' चित्रपटाचे प्रिंट्स चित्रपटगृहात पोहोचण्यास उशीर झाला. यामुळे बहुतेक सिनेमागृहांमध्ये चित्रपटाचा पहिला शो रद्द करावा लागला. या गैरसोयीमुळे सन्नी देओलचे चाहते थोडे निराश दिसत आहेत.
मॉर्निंग शो रद्द झाल्यामुळे 'बॉर्डर २' च्या कमाईवर थोडा परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, लोकांमध्ये या चित्रपटाबद्दल प्रचंड क्रेझ आहे आणि सन्नी देओलचे चाहते हा सीक्वल पाहण्यासाठी सहज वेळ काढू शकतात. अशा परिस्थितीत, एक शो रद्द झाल्यामुळे फार मोठा परिणाम होईल असे नाही.
सन्नी देओलने इंस्टाग्रामवर 'बॉर्डर २' चा एक व्हिडिओ शेअर केला आहे. याचसोबत त्याने लोकांना चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे.