

बॉलीवूडमधील कलाकारांची एक झलक पाहण्यासाठी चाहते तासन्तास वाट पाहतात. मात्र काही वेळा त्याच कलाकारांचे वर्तन चाहत्यांच्या अपेक्षांना तडा देणारे ठरते. अशीच एक घटना अभिनेत्री कियारा अडवाणी हिच्याबाबत समोर आली आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कार्तिकेय याने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये त्याने दावा केला आहे की, तो जयपूरहून मुंबईकडे आईसोबत बिझनेस क्लासने प्रवास करत होता. त्याच फ्लाईटमध्ये अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता कार्तिक आर्यन हेही प्रवास करत होते. हे दोघे ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जयपूरला गेले होते. फ्लाईटमध्ये सीट क्रमांकाबाबत गोंधळ झाल्याने त्याची आई चुकून कियाराच्या सीटवर बसली.
मात्र एअरहोस्टेसने माहिती दिल्यानंतर त्या तत्काळ उठून आपल्या जागेवर गेल्या. या संपूर्ण प्रकारात कोणताही वाद झाला नाही, असेही कार्तिकेयने स्पष्ट केले. मात्र कार्तिकेयने असा आरोप केला आहे की, या घटनेदरम्यान कियारा अडवाणीने जी प्रतिक्रिया दिली, ती अत्यंत अप्रिय आणि उद्धट होती. माझ्या आईकडे पाहून तिने तोंड वाकडं केलं आणि अस्वस्थ चेहर्याचे हावभाव केले, असा दावा त्याने व्हिडीओमध्ये केला आहे. यावरून अनेक यूजर्सनी कियारावर टीका केली आहे.