मनोरंजन

जय भवानी जय शिवाजी : ‘पावनखिंड’ लढाईचा थरार, भूषणने व्यक्त केली भावना

स्वालिया न. शिकलगार

बाजीप्रभू देशपांडे यांचा गनिमांसोबतचा 'पावनखिंड' मधील झंझावात हे इतिहासातलं महत्वाचं पान आहे. शिवरायांना विशाळगडावर सुखरुप पोहोचवण्यासाठी बाजीप्रभू देशपांडे यांनी जीवाची बाजी लावली. सिद्दी मसूदच्या सैन्याला 'पावनखिंड'मध्येच रोखून धरलं. शिवरायांवरील निष्ठेपायी आणि स्वराज्य स्थापनेसाठी अफाट गनिमांसमोर बाजीप्रभू वाघासारखे लढले. बाजीप्रभूंच्या समर्पणाने पावन झालेल्या या खिंडीला म्हणूनच 'Pavankhind' असं नाव पडलं. हा लढाईचा थरार मालिकेत पाहायला मिळणार आहे.

स्टार प्रवाहवरील जय भवानी जय शिवाजी या मालिकेतून इतिहासातला हा महत्त्वाचा अध्याय पुन्हा जिवंत होणार आहे. हा ऐतिहासिक प्रसंग पुन्हा जिवंत करण्यासाठी मालिकेची संपूर्ण टीम सज्ज झाली आहे.

छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणारा अभिनेता भूषण प्रधान याने आपली भावना व्यक्त केल्या. 'pavankhind इतक्यात नको… पुढे जाईल तर बरे… गेले अनेक आठवडे असेच वाटत होते. पण अखेर तो दिवस आला. आमचे बाजी जाणार! प्रोमोशूट चा दिवस आठवतो. नुकताच तापातून उठून प्रोमोशूटला गेलो. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडेह यांचा प्रोमो. त्यादिवशी अजिंक्य देव यांना भेटलो. पहिलीच भेट!

संभाषणाला सुरूवात झाली तीच जणू अनेक वर्षांपासूनची ओळख असल्यासारखी. सर, अजिंक्यजी असे कोणतेही पर्याय न देता भेटता क्षणी तो अजिंक्य दादा झाला. प्रोमो शूट संपले आणि न बोलताच एकमेकांना सांगून गेलो की एकमेकांना सांभाळत, एकमेकांवर विश्वास ठेवत आपला हा प्रवास सुखकर होणार.

अजिंक्य दादा सेटवर आला की एक वेगळीच ऊर्जा सेटवर असायची. एरवी खूप बोलणारा मी मात्र अजिंक्य दादा आणि मी सेट वर असलो आणि वेळ मिळाला की बोलावेसे वाटायचे, शेअर करावेसे वाटायचे. दादा एक उत्तम श्रोता, शांत आणि खरा स्वभाव, हसतमुख आणि अतिशय ग्राउंडेड. आयुष्यात अनेक संकटांना सामोरा गेला असणार तरी चेहरा हसतमुख, कसलाच माज किंवा गर्व नाही. अनुभवी असूनही प्रचंड मेहनती. ५ महिन्यांचा त्याचा हा मलिकेतील प्रवास मला खूप काही शिकवून गेला आणि मी एक मित्र, एक मोठा भाऊ कमावला.

५ महिन्यांनंतर अजिंक्य दादाचा मालिकेतील प्रवास संपणार या विचाराने हळवा होत असताना, एक विचार मनात सारखा येतोय. घोडखिंडीत बाजीप्रभू देशपांडे यांना गमावल्यानंतर राजांना काय वाटलं असेल?

छत्रपती शिवाजी महाराजांनी, स्वराज्य स्थापनेचा प्रवास चालू ठेवला असावा ते दुःख गिळून, पण ओलावा जपून! अजिंक्य दादा, लवकरच भेटू… नवीन भूमिकेत आणि आपापल्या भूमिकेतही!

बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारणारे सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी हा ऐतिहासिक प्रसंग शूट करण्याचा अनुभव सांगतिला. 'ज्याच्यासाठी सारा केला होता अट्टाहास असाच काहीसा हा प्रसंग आहे. हा सीन शूट करणं आव्हानात्म होतं. हा प्रसंग अंगावर शहारा आणणारा आहे.

सीन शूट करताना इतकी स्फूर्ती आहे की थोडाही क्षीण जाणवत नाहीये. आमचे कलादिग्दर्शक अजित दांडेकर यांनी पावनखिंडीचा अतिशय हुबेहुब असा सेट उभारला आहे.

प्रेक्षकांना हा खास भाग नक्कीच आवडेल याची खात्री आहे. तेव्हा पाहायला विसरु नका जय भवानी जय शिवाजी रात्री सोमवार २२ नोव्हेंबरला रात्री १०.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT