Bandkhor Marathi Movie Review Pudhari
मनोरंजन

Bandkhor Marathi Movie Review: समाजाच्या पारंपरिक चौकटीला छेद देणाऱ्या चारचाैघी बंडखोर

महेश मांजरेकर दिग्दर्शित चित्रपटात स्त्री आत्मसन्मान, अन्यायाविरोधातील संघर्ष आणि पुरुषसत्ताक चौकटींना आव्हान देणाऱ्या नायिकांचा प्रवास

पुढारी वृत्तसेवा

समाजाच्या पारंपरिक चौकटी ओलांडून निर्णय घेण्याचे धाडस प्रत्येकात असतेच असे नाही. हे धाडस दाखवणाऱ्यांना समाज बंडखोरीचे लेबल लावते. पुराण काळापासून आजतागायत बंडखोर प्रवृत्तीने नियमांना, चालीरीतींना डावलून प्रवाहाविरोधात पोहणाऱ्या अनेक व्यक्तिरेखा आपण ऐकल्या, पाहिल्या आहेत.

पण स्त्रिया आत्मसन्मान अन्यायाविरोधात उभं राहण्यासाठी अशा वाटा चोखाळतात. महेश मांजरेकर दिग्दर्शित 'बंडखोर' चित्रपटातील नायिकांचा प्रवासही असाच आहे.

मीरा (प्रियदर्शनी इंदलकर) मुंबईच्या मोठ्या जाहिरता कंपनीत कार्यरत आहे. स्पष्टवक्ती,कामात चोख आणि तापट असलेल्या मीराचा नील (संकेत पाठक) हा प्रियकर आहे. मीरा नीलच्या पहिल्या भेटीची वर्षपूर्ती त्यांना साजरी करायची आहे. त्याचवेळी तिचा कंपनीतला सहकारी आभास (सिध्दार्थ बोडखे) सहज त्यांच्या भेटीत सहभागी होतो.

त्यातून नीलच्या मनात संशय उत्पन्न झाल्याने मीराचा आणि त्याचा ब्रेकअप होतो. त्यातच मीराला आजोबा वारल्याची बातमी कळल्याने मीरा गोव्याला आजीच्या घरी येते आणि या घरात आपल्याला एकेक बंडखोर नायिका भेटतात.

चार-दोन स्त्रिया एकत्र आल्या की त्या एकमेकींची उणी-दुणी, दुस्वास करताना दिसतात. पण त्याच स्त्रियांनी एकमेकींना समजून घेतले तर एकमेकींच्या आधाराने त्या कशा रूढी-परंपरांमुळे होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात ठाम उभं राहू शकतात, याची कथा मांजरेकरांनी आपल्या दिग्दर्शकीय कसबातून गुंफली आहे.

उषा आज्जी (छाया कदम) नवऱ्याने आयुष्यभर ठेवलेल्या शारदा (मृणाल कुलकर्णी) हिचा दुस्वास न करता तिला समजून घेत नवऱ्याच्या पश्चात तिला कुटुंबात सामावून घेते. तिच्या वाटेची संपत्तीही तिला देण्याबाबत आग्रही राहते.

उषाची मुलगी सीमा (तितिक्षा तावडे) ही सासरी झालेल्या अन्यायाच्या विरोधात बंड करून मुलगी मीराला एकल माता आणि यशस्वी व्यावसायिक म्हणून जगते आहे.

पुरूषसत्ताक विरोधात शांत आणि संयमात लढा देणाऱ्या आज्जी आणि आईच्या एक पाऊल पुढे टाकत मीराच्या वाटेला कुठला संघर्ष येतो? मीराचे धैर्याचे जगणं बघून तिची मामेबहीण कोणते पाऊल उचलते, या सगळ्याजणी पुरूषसत्तेचे प्रातिनिधिक प्रतीक असलेल्या मामाला कसे वठणीवर आणतात, ही सगळी बंडखोरी चित्रपटात पाहण्यासारखी आहे.

स्त्रीप्रधान कथा आणि नायिका असलेल्या या चित्रपटात महेश मांजरेकर यांनी स्त्रियांना पुरूषसत्ताक परंपरेतून भोगाव्या लागणाऱ्या यातनाचा ओझरता स्पर्श केला आहे. स्त्रियांचे अनेक प्रश्न एकाच कथेत गुंफण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला असला तरी त्यात प्रत्येकीच्या वाट्याला आलेल्या संघर्षाची झळ तितकीशी तीव्रतेने अधोरेखित होत नाही.

प्रत्येकाला समजून घेणाऱ्या आज्जीला नातीच्या मनाविरोधात होणाऱ्या लग्नाला विरोध करत नाही, अशा काही किरकोळ विसंगती आहेत. वयापेक्षा मोठ्या पात्राची आज्जीच्या भूमिकेत छाया कदम अतिशय सहज वावरल्या आहेत. मृणाल कुलकर्णी आधीची नि:शब्द आणि नंतर रिती होणारी शारदाही लक्ष वेधून घेते. स्पष्टवक्ती विचारांवर ठाम असणारी प्रियदर्शनी इंदलकरची मीराही मनात ठसते. इतर सर्व कलाकारांची भूमिकांवरची पकड जाणवते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT