Prabhas-Anushka Shetty Baahubali 3 Confirm buzz  pudhari photo
मनोरंजन

Baahubali 3 Confirm? : प्रभासने तीन बोटे दाखवली अन्‌ अनुष्काचं हसू; 'बाहुबली ३' बाबत डॉक्युमेंटरीमध्ये उघड झाली माहिती

Baahubali 3 Confirm? : प्रभासने तीन बोटे दाखवली अन्‌ अनुष्का हसली; 'बाहुबली ३' बाबत

स्वालिया न. शिकलगार

नेटफ्लिक्सवरील Baahubali: The Torchbearer डॉक्युमेंटरीतील एका दृश्यामुळे 'बाहुबली ३' पुन्हा चर्चेत आला आहे. प्रभासने तीन बोटे दाखवल्यानंतर आणि अनुष्का शेट्टी हसताना दिसल्यानंतर चाहत्यांनी तिसऱ्या भागाची चर्चा सुरू केली. मात्र, दिग्दर्शक एस. एस. राजामौली किंवा निर्मात्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

बाहुबली' आणि 'बाहुबली २'च्या अभूतपूर्व यशानंतर या गाजलेल्या फ्रँचायझीचा तिसरा भाग येणार का, याबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे. 'बाहुबली: द टॉर्चबियरर' या डॉक्युमेंटरीतील एका व्हायरल क्लिपमुळे 'बाहुबली ३'च्या शक्यतेबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

या व्हिडिओमध्ये प्रभास, राणा दग्गुबाती आणि अनुष्का शेट्टी आगामी भागाबाबत सूचक इशारे देताना दिसतात. राणा म्हणतो, "जग कदाचित अजून त्यासाठी तयार नसेल, पण बाहुबली नक्कीच परत येईल..." त्यानंतर प्रभास तीन बोटे दाखवत हसतो आणि त्यावर उपस्थित सर्वजण हसताना दिसतात. क्लिपच्या शेवटी "हा वारसा पुढेही सुरू राहील" असा संदेश झळकतो, त्यामुळे 'बाहुबली ३'ची चर्चा आणखी रंगली आहे.

या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी आनंद व्यक्त केला. अनेकांनी 'बाहुबली ३'ची अधिकृत घोषणा लवकरच होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. काहींनी 'बाहुबली'ने भारतीय चित्रपटसृष्टीत कथाकथन, भव्यता, व्हिज्युअल्स आणि बॉक्स ऑफिस यशाचे नवे मापदंड निर्माण केल्याचेही नमूद केले.

दरम्यान, 'बाहुबली: द टॉर्चबियरर' ही चार भागांची डॉक्युमेंटरी २६ जूनपासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. या माहितीपटातून 'बाहुबली' फ्रँचायझीच्या निर्मितीमागील प्रवास, पडद्यामागील किस्से, कलाकारांच्या मुलाखती आणि याआधी कधीही न पाहिलेले अनेक क्षण प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत.

एस.एस. राजामौली दिग्दर्शित 'बाहुबली' आणि 'बाहुबली २'मध्ये प्रभास, राणा दग्गुबाती, अनुष्का शेट्टी, तमन्ना भाटिया, रम्या कृष्णन आणि नासिर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. २०१५ आणि २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या या दोन्ही चित्रपटांनी भारतीय चित्रपटसृष्टीला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून दिली आणि प्रभासला अखिल भारतीय सुपरस्टार म्हणून स्थापित केले. मात्र, 'बाहुबली ३'बाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. व्हायरल क्लिपमधील इशाऱ्यांमुळे केवळ तर्क-वितर्कांना उधाण आले असून, अधिकृत पुष्टीची चाहत्यांना अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT