मनोरंजन

Asha Bhosle Passes Away | सांगलीत जन्म...१६ हजारांहून अधिक गाणी, स्वरस्वामिनी आशाताईंचा प्रवास

तब्बल 1000 पेक्षा जास्त चित्रपटांमध्‍ये गायन, आशाताईंच्या आवाजामुळे हिंदी गीतांना मिळाली नवी उंची

पुढारी वृत्तसेवा

Asha Bhosle Passes Away

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

गेल्या आठ दशकांमधून आपल्या आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे आज (दि. १२) निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना शनिवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आशा भोसले यांच्या निधनाने संपूर्ण संगीतसृष्टीवर शोककळा पसरली आहे. आशा भोसले यांनी गाण्याच्या माध्यमातून अनेक दशके राज्यासह देशाच्या मनावर अधिराज्य गाजवले. आशाताईंनी मराठी, हिंदी तसेच 20 हून अधिक भारतीय भाषांमध्ये तब्बल 16 हजार गाणी गायली होती. जाणून घेऊया स्वरस्वामिनी आशाताईंचा स्वरमयी प्रवास...

मंगेशकर घराण्‍याचा वारसा...

आशा भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगली येथे झाला. वडील दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक होते. गाणे शिकण्याची संधी त्यांना घरातूनच मिळाली. आशाताई 9 वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. यानंतर त्यांचे कुटुंब पुण्याहून कोल्हापूर आणि त्यानंतर मुंबईत आले. कुटुंबाच्या मदतीसाठी आशा आणि मोठी बहीण लता मंगेशकर यांनी सिनेमांत गाणी गायला सुरुवात केली.

तब्बल 1000 पेक्षा जास्त चित्रपटांमध्‍ये गायन

आशा भोसले यांनी चित्रपट गायनाची सुरुवात माझा बाळ या मराठी चित्रपटातून 1943 मध्‍ये केली. त्यानंतर 1948 मध्ये त्यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. बॉलीवूडमध्ये तब्बल 1000 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये त्यांनी गाण्यांना आवाज दिला आहे. आशा भोसले यांनी हिंदी, मराठी, बंगाली, तेलगू, तामिळ, इंग्रजी अशा भाषेत गाणी गायली आहेत.

आशाताईंच्या आवाजामुळे हिंदी गीतांना मिळाली नवी उंची

मराठी तसेच हिंदी गीतांना त्यांच्या आवाजामुळेच एक नवी उंची मिळाली. त्यांच्या संपूर्ण हयातीत त्यांनी अनेक सदाबहार गीते चित्रपटसृष्टी आणि रसिकांना दिली. त्यांनी गायलेले चुरा लिया है तुमने जो दिल को हे गीत आजही अनेकांना जवळचे वाटते. आशाताईंनी आजवर हिंदीसह अनेक भाषांमध्ये हजारो गाणी गायली आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांनी स्वतःचे यूट्यूब चॅनलही सुरू केले. तरुण गायकांसाठी काहीतरी करावे, असे त्यांना वाटत होते. त्यातून युट्यूबचा विचार पुढे आल्याचे त्यांनी सांगितले होते.

मंगेशकर घराण्यातील दुसऱ्या महाराष्ट्रभूषण!

आशा भोसले यांच्या आधी त्यांच्या थोरल्या बहिण भारतरत्न लता मंगेशकर यांनाही महाराष्ट्रभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. एकाच कुटुंबातील एकाहून अधिक व्यक्तींना महाराष्ट्रभूषण लता मंगेशकर आणि आशा भोसले या दोन बहिणींना प्राप्त झाला आहे. महाराष्ट्रभूषण पुरस्कार मिळवणारे मंगेशकर कुटुंबीय एकमेव ठरले होते.

आशा भोसले यांना मिळालेले पुरस्कार

  • 1997 मध्ये गानसाम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार.

  • 2020 महाराष्ट्र भूषण.

  • विविध भाषांमध्ये तब्बल 16 हजार गाणी गायल्यामुळे 2011 साली आशा भोसले यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले.

  • 5 मे 2008 रोजी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित.

  • 2000 मध्ये भारतीय सिनेमातील उत्कृष्ट योगदानाबद्दल दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित.

  • सात वेळा फिल्मफेअर पुरस्कारावर आपले नाव कोरले, तर 18 वेळा नामांकनही मिळाले.

  • दोन वेळा गाण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT