Ankita Lokhande post on Priya Marathe
मुंबई - अभिनेत्री अंकिता लोखंडेची मालिका पवित्र रिश्ता प्रचंड गाजली. या मालिकेत अंकिता सोबत प्रिया मराठे, प्रार्थना बेहेरे आणि अन्य कलाकारही होते. आता अंकिताने इन्स्टाग्रामवर खूप जुने फोटो शेअर केले असून त्यामध्ये अंकिता-प्रिया-प्रार्थना अशी त्रिकुटांची जोडी दिसतेय. अंकिताने प्रियाच्या सुंदर आठवणींना उजाळा दिला. तिने फोटो शेअर करत मोठी पोस्ट लिहिलीय. अंकिताने इन्स्टा पोस्टमध्ये काय म्हटलंय?
'''प्रिया ही माझी पवित्र रिश्तामधील पहिली मैत्रीण होती. मी, प्रार्थना आणि प्रिया.. आमचा छोटीसा ग्रुप.. आम्ही एकत्र असताना नेहमीच खूप छान वाटायचे. प्रिया, प्रार्थना आणि मी एकमेकांना मराठीत प्रेमाने वेडी म्हणायचो आणि ते नाते खरोखरच खास होते.. माझ्या चांगल्या दिवसांत ती माझ्यासोबत होती आणि माझ्या दुःखाच्या दिवसांतही ती माझी साथ देत असे...जेव्हा मला तिची गरज होती तेव्हा ती कधीही चुकली नाही. गणपती बाप्पाच्या वेळी गौरी महाआरतीला उपस्थित राहणे तिने कधीही चुकवले नाही आणि या वर्षी, मी इथे तुझ्या आत्म्यासाठी प्रार्थना करेन, माझी वेडी.. तुझी खूप आठवण येत असताना.''
अंकिता पुढे लिहिते- ''प्रिया खूप मजबूत होती. तिने प्रत्येक लढाई इतक्या धैर्याने लढली. आज ती नाहीये आमच्यासोबत, आणि हे लिहितानाही माझे हृदय तुटत आहे. तिला गमावणे ही एक आठवण आहे की आपल्याला खरोखर माहित नाही की एखाद्याच्या हास्यामागे कोणीतरी किती संघर्ष करत आहे. म्हणून दयाळू राहा... नेहमी.''
शेवटच्या निरोपात अंकिताने खूप भावूक संदेश लिहिला आहे. ''प्रिया, माझी प्रिय वेडी, तू नेहमीच माझ्या हृदयात आणि माझ्या आठवणींमध्ये राहशील. प्रत्येक हास्य, प्रत्येक अश्रू, प्रत्येक क्षणासाठी धन्यवाद. आपण पुन्हा भेटेपर्यंत... ओम शांती.''
अंकिताने प्रियासोबत घालवलेले क्षण, शूटिंगच्या घटना, एकत्र असतानाचे बॉन्डिंग सर्वकाही या पोस्ट आणि फोटोच्या माध्यमातून शेअर केले आहेत.
मागील दोन-अडीच वर्षांपासून प्रिया कॅन्सरने पीडित होती. आधी ठिक झाली. पण नंतर तिला कॅन्सर झाला आणि उपचारानंतरही तिची तब्येत बिघडत गेली. ३१ ऑगस्ट रोजी तिने जगाचा निरोप घेतला.
‘पवित्र रिश्ता’ मालिकेत प्रिया मराठे हिच्या पतीची भूमिका साकारणारा अभिनेता अनुराग शर्मा भावूक झाला. त्याने सोशल मीडियावर एक भावूक पोस्टच्या माध्यमातून आपले दु:ख जाहीर केले. त्याने लिहिले, 'आज जी बातमी मिळालीय, त्यावर विश्वास करणे कठिण आहे. मन तुटलं आहे. मी एक दमदार कलाकार, एक सुंदर व्यक्ती आणि एक खऱ्या मैत्रीणीला गमावलं आहे. तिच्या सोबत घालवलेले हजरो क्षण मला आटवत आहेत. पण माझे हात कापत आहेत. तुमच्या सोबत स्क्रीन शेअर करणे माझ्यासाठी गर्वाची गोष्ट होती. तुझे हसणे, तुझे प्रेम, सर्व काही नेहमी आठवणीत राहील. परमेश्वर तुझ्या आत्म्याला शांती देवो. ओम शांती, माझी मैत्रीण प्रिया मराठे.'