Anant Hari Gadre Housefull pudhari
मनोरंजन

Anant Hari Gadre Housefull: 'हाऊसफुल्ल' हा शब्द कसा आला? या रंजक संकल्पनेमागं आहे एक मराठी माणूस

Anirudha Sankpal

Anant Hari Gadre Origin Of Housefull: आज जगभरातील कोणत्याही कोपऱ्यात चित्रपटगृह किंवा नाट्यगृह प्रेक्षकांनी पूर्ण भरले की, बाहेर एक पाटी झळकते— 'HOUSEFULL'. हा शब्द आज जागतिक स्तरावर इतका रूढ झाला आहे की, तो मूळ इंग्रजी असावा असाच सर्वांचा समज आहे. मात्र, या शब्दाचा आणि तो वापरण्याच्या संकल्पनेचा उगम मुंबईतील गिरगावमध्ये झाला असून, त्याचे जनक 'समतानंद' अनंत हरी गद्रे हे आहेत.

रॉयल ऑपेरा हाऊस

१९२०-३० च्या दशकात मराठी नाटकांची मोठी क्रेझ होती. अनंत हरी गद्रे हे एक प्रगतशील विचारवंत आणि 'मौज' व 'निर्भीड' साप्ताहिकांचे संपादक होते. त्यांना नाटकांच्या आणि सिनेमांच्या 'पब्लिसिटी'मध्ये (प्रसिद्धी) विशेष रस होता. मार्केटिंग ही संकल्पना भारतात रुजण्यापूर्वीच गद्रे यांनी ती अंमलात आणली होती.

अन् हाऊसफुल्लचा जन्म झाला

एकदा मुंबईतील प्रसिद्ध 'रॉयल ऑपेरा हाऊस'मध्ये नाटकाचा प्रयोग होता. प्रेक्षकांची अलोट गर्दी पाहून आणि जागा शिल्लक नसल्याचे पाहून गद्रे यांच्या डोक्यात एक विचार चमकला. त्या काळी न्यूयॉर्क किंवा लंडनमध्येही केवळ 'टिकेट्स सोल्ड' (Tickets Sold) असा फलक लावला जाई. गद्रे यांनी मात्र 'House' (गृह) आणि 'Full' (पूर्ण) हे दोन शब्द एकत्र जोडून 'Housefull' असा शब्द तयार केला आणि त्याची पाटी लावली. हा शब्द इतका प्रभावी ठरला की, तो अल्पावधीतच जगभर प्रसिद्ध झाला.

मार्केटिंगचे 'भीष्म पितामह'

अनंत हरी गद्रे यांनी केवळ शब्दच दिला नाही, तर जाहिरातबाजीची नवी शैली विकसित केली. आचार्य अत्रे यांच्या 'घराबाहेर' या नाटकासाठी त्यांनी— "सगळी मुंबई आज घराबाहेर पडली आहे!" —अशी जाहिरात करून लोकांना नाटकाकडे खेचले होते. आजही गिरगावच्या ठाकूरद्वार परिसरात 'अनंत हरी गद्रे मार्ग' त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देत उभा आहे.

समाजसुधारणेचा वारसा

गद्रे यांनी केवळ मनोरंजनातच नव्हे, तर समाजसुधारणेतही मोलाचे योगदान दिले. जातिभेद गाडण्यासाठी त्यांनी 'झुणका-भाकर' सहभोजन आणि 'स्पृश्यास्पृश्य सत्यनारायण' यांसारख्या चळवळी राबवल्या. आज जेव्हा आपण एखाद्या नाटकाच्या बाहेर 'हाऊसफुल्ल'ची पाटी पाहून अभिमानाने दाटून येतो, तेव्हा त्यामागे एका मराठी माणसाची कल्पकता आणि दूरदृष्टी दडलेली आहे, हे विसरता कामा नये.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT