Anandhi Ajay shared emotional video over deleted her scenes in jana nayagan  pudhari photo
मनोरंजन

Anandhi Ajay on Jana Nayagan | विजयसोबत काम करण्याचे स्वप्न भंगले; 'जन नायकन'मधील दृश्ये वगळल्यानंतर अभिनेत्रीने थेट व्हिडिओ केला शेअर

Anandhi Ajay on Jana Nayagan | थलपती विजयसोबत काम करण्याचे स्वप्न भंगले; 'जन नायकन'मधील दृश्ये वगळल्यानंतर 'या' अभिनेत्रीने थेट व्हिडिओ केला शेअर

पुढारी वृत्तसेवा

थलपती विजयच्या 'जन नायकन' या बहुचर्चित चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली असली, तरी या चित्रपटाशी संबंधित एक भावनिक घटना समोर आली आहे. तमिळ अभिनेत्री आणि शास्त्रीय नृत्यांगना आनंदी अजय हिने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आपल्या मनातील खंत व्यक्त केली. अंतिम एडिटिंगनंतर चित्रपटातील तिची सर्व दृश्ये काढून टाकण्यात आल्याने ती खूपच भावूक झाली आणि तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ देखील शेअर केला.

आनंदीचे स्वप्न अपूर्णच राहिले...

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत थलपती विजयसोबत काम करण्याची संधी अनेक कलाकारांसाठी मोठे स्वप्न मानली जाते. आनंदीसाठीही हा प्रकल्प तितकाच खास होता. जवळपास वर्षभर ती 'जन नायकन'च्या प्रोजेक्टशी जोडलेली होती आणि मोठ्या पडद्यावर विजयसोबत झळकण्याची ती आतुरतेने वाट पाहत होती. मात्र, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर थिएटरमध्ये स्वतःचा एकही सीन दिसला नाही, तेव्हा तिला अश्रू अनावर झाले.

'जन नायकन'मधील सर्व दृश्ये वगळली

या अनुभवाबद्दल बोलताना आनंदीने सांगितले की, अंतिम एडिटिंगनंतर काही कलाकारांची दृश्ये वगळली जाणे ही चित्रपटसृष्टीतील मोठी बाब नाही. याआधीही तिच्या काही चित्रपटांमधील दृश्ये वगळण्यात आली होती, पण त्यावेळी तिला फारसे वाईट वाटले नव्हते. मात्र, 'जन नायकन'च्या बाबतीत ही भावना वेगळी होती. कारण विजय यांच्यासोबत काम करण्याचे स्वप्न घेऊनच तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवल्याचे सांगितले.

तिने सांगितले की, चित्रपट पाहण्यासाठी ती प्रचंड उत्साहाने थिएटरमध्ये गेली होती. स्वतःला पडद्यावर पाहण्याची उत्सुकता होती, पण एकही दृश्य न दिसल्याने ती पूर्णपणे निराश झाली. हा चित्रपट तिला तिच्या करिअरमध्ये यशाचे दरवाजे उघडणारा होता. तिने त्याक्षणी आपण किती दुर्दैवी आहोत, अशी भावना व्हिडिओमध्ये सांगितली.

दिग्दर्शक एच. विनोद यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा चित्रपट विजय यांचा अभिनय क्षेत्रातील अखेरचा चित्रपट म्हटला जात आहे. त्यानंतर ते पूर्णवेळ राजकारणात सक्रिय होणार असल्याने भविष्यात त्यांच्यासोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळणार नाही, असे आनंदीचे म्हणणे आहे.

आनंदी अजय कोण आहे?

'कार्तिगई पेंगल' (Karthigai Pengal), 'काना कानुम कालंगल' (Kana Kaanum Kaalangal) आणि 'यमुना' (Yamuna) यांसारख्या तमिळ मालिका तिने केल्या आहेत. ती एक शास्त्रीय नृत्यांगना आहे. 'डान्स जोडी डान्स 3.0', 'मानाडा मायिलाडा' 'जोडी नंबर-1' च्या अनेक सीझन्ससह अनेक डान्स रिअॅलिटी शोमध्ये तिने सादरीकरण केले आहे. तसेच 'गट्टा कुस्ती २' आणि सूर्या स्टारर 'करुप्पु' चित्रपटांमध्ये तिने छोटी भूमिका साकारली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT