अभिनेत्री अमृता देशमुखने पुण्यातील एका प्रसिद्ध नाट्यगृहातील दयनीय परिस्थितीवर आवाज उठवला आहे. साडीत उंदीर जाणे, डासांचा प्रचंड त्रास आणि मूलभूत सुविधांचा अभाव यावर तिने तीव्र टीका करत PMC प्रशासनाला थेट प्रश्न विचारले असून तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Amruta Deshmukh criticised on theaters washrooms in pune
मराठी रंगभूमी आणि सांस्कृतिक चळवळीचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील नाट्यगृहांच्या अवस्थेबाबत अभिनेत्री अमृता देशमुखने तीव्र संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने पालिकेच्या (PMC) दुर्लक्षावर थेट बोट ठेवलं आहे.
अमृता देशमुख आपल्या पोस्टमध्ये म्हणते, ''आर्टिस्ट येतात, मनापासून प्रयोग करतात, निघून जातात..म्हणून किती गृहीत धरावं?'' असा सवाल करत तिने कलाकारांप्रमाणेच प्रेक्षकांनाही गृहीत धरलं जात असल्याची भावना व्यक्त केली आहे. नाटक पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांना साडीत उंदीर जात असल्याचा अनुभव येतो, तर डासांच्या त्रासामुळे संपूर्ण प्रयोग अस्वस्थतेत पार पडतो, असं तिने नमूद केलं आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करून ही व्यथा मांडली आहे.
अमृताने काय म्हटलंय पोस्टमध्ये?
''बालगंधर्व रंगमंदिरात नाटकाचा प्रयोग आहे. गेले कित्येक प्रयोग मी अनुभवते. आणि मला खात्री आहे की, खूप जण अनुभवत असणार आहेत. पुण्यातील कित्येक थिएटर्स आहेत, जे छान मेटेंन केलेलं असतं. नुकतेच आम्ही विठ्ठलराव तुपे रंगमंदिरात प्रयोग केला, तेथील वॉशरुम्स छान ठेवलेले असतात. आणि आता बालगंधर्व रंगमंदिराची नेहमीच रड आहेत. इतके घाणेरडे रुम्स असतात. बॅकस्टेजला एन्ट्री केली की, तिथे घाण वास यायला सुरुवात होते.
''जे व्हीआयपी रुम नुतनीकरण करण्यासाठी ढिगभर पैसा ओतला जातो, त्यापेक्षा तिथेले रुम्स, वॉशरुम्स त्याची सुधारणा करावी, इतकी माफक अपेक्षा आहे. रुम्समधील ॲटॅच्ड बाथरुम्स आहेत, त्याची दुरावस्था आहेत. ''स्वच्छता कर्मचारीदेखील फारसे लक्ष देत नाही. राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. खूप जुने हे रंगमंदिर आहे. इथे सतत प्रयोग होत असतात, अनेकांचे सादरीकरण होत असतात.''
तिने थेट @pmccarepune @pmc_pune यांना टॅग करत, ''प्रेक्षक नाटकाच्या प्रेमापोटी येतात, जातात…त्यांनाही असंच गृहीत धरायचं का?” असा थेट सवाल उपस्थित केला आहे. पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरातल्या एका नावाजलेल्या नाट्यगृहाची ही अवस्था असल्याने तिने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
अमृता देशमुखच्या या पोस्टवर खूप सारे कॉमेंट्स आणि कलाकार, रंगकर्मी आणि नाट्यप्रेमींनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी नाट्यगृहांमधील अस्वच्छता, अपुरी स्वच्छतागृहे आणि डासांचा त्रास याबाबत तक्रारी मांडल्या आहेत.