kbc host amitabh bachchan viral x post belt broken during shooting
मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडिया साइट ‘एक्स’वर नेहमीच सक्रिय असतात. ते सातत्याने आपले विचार आणि अनुभव चाहत्यांसोबत शेअर करत असतात. अनेकदा त्यांचे ट्विट्स इतके अनपेक्षित असतात की त्याचा नेमका अर्थ लावणे नेटकऱ्यांना कठीण जाते; तर कधीकधी ते इतके मिश्कील आणि विनोदी लिहितात की हसू आवरणे कठीण होते. आपल्या ताज्या ‘एक्स’ पोस्टमध्येही त्यांनी असाच एक मजेशीर किस्सा शेअर केला आहे. 'कौन बनेगा करोडपती'च्या (KBC) शूटिंगदरम्यान आपल्या पॅन्टचा बेल्ट तुटल्याचे सांगत, ‘पटकन नाडी बांधली आणि मोठा प्रसंग टळला,’ अशी मिश्कील पोस्ट बच्चन यांनी केली आहे.
अमिताभ बच्चन यांची ही पोस्ट काही मिनिटांतच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. वयाची ८४ वर्षे पूर्ण केलेले महानायक अमिताभ बच्चन आजही मोठ्या उत्साहाने 'कौन बनेगा करोडपती'चे सूत्रसंचालन करत आहेत. काही दिवसांपूर्वीच शूटिंगदरम्यान सेटवर पाय घसरून पडल्याने त्यांच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्यांनी पुढील भागाचे सूत्रसंचालन खुर्चीवर बसून केले होते. नेहमीप्रमाणे धावत मंचावर येऊन शोची सुरुवात करणे पायाच्या दुखापतीमुळे शक्य होत नसल्याचे त्यांनी स्वतःच कार्यक्रमात प्रेक्षकांना सांगितले होते. त्यानंतर आता पॅन्टचा बेल्ट तुटल्याचा किस्सा त्यांनी शेअर केल्याने चाहत्यांमध्ये याची जोरदार चर्चा रंगली आहे.
बिग बींच्या या ताज्या पोस्टवर नेटकऱ्यांनी संमिश्र आणि भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत म्हटले की, "आता पुरे करा सर, तुमची उरलेली प्रतिष्ठाही या बेल्टसारखीच तुटत चालली आहे." तर दुसऱ्या एका युजरने विनोदी शैलीत लिहिले की, "परदेशी बेल्टने साथ सोडली, पण देशी नाडीनेच अखेर लाज राखली; म्हणूनच 'ओल्ड इज गोल्ड' असे म्हणतात." काही युजर्सनी नाराजी व्यक्त करत अशा गोष्टी जाहीरपणे पोस्ट करू नयेत असा सल्ला दिला, तर काहींनी हसण्याचे इमोजी शेअर करत "प्रत्येक गोष्ट सार्वजनिकरीत्या सांगण्यासाठी नसते अमितजी," अशी प्रतिक्रिया दिली आहे.
या पोस्टवर अशा शेकडो कमेंट्सचा पाऊस पडत असला तरी, हे वृत्त लिहीपर्यंत अमिताभ बच्चन यांनी यापूर्वी किंवा त्यानंतर कोणतीही नवीन पोस्ट केलेली नाही. त्यामुळे ही घटना खरोखरच घडली आहे की हा निव्वळ एक विनोद अथवा आगामी प्रोजेक्टच्या प्रमोशनचा भाग आहे, याचा अंदाज लावणे कठीण झाले आहे. मात्र, सध्या त्यांची ही पोस्ट इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. कामाच्या आघाडीवर बोलायचे झाल्यास, अमिताभ बच्चन आगामी काळात 'सेक्शन ८४' या चित्रपटात दिसणार असून, यामध्ये त्यांच्यासोबत अभिनेता अभिषेक बॅनर्जी महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.