मुंबईतील 'जलसा' या आपल्या निवासस्थानाबाहेर दर रविवारी चाहत्यांना दर्शन देण्याची अमिताभ बच्चन यांची दशकानुदशके जुनी परंपरा आहे. मात्र, २४ मे रोजी झालेल्या या दर्शनादरम्यान एका चाहत्याला चक्कर आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. गर्दीमुळे परिस्थिती सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंनुसार, बिग बींची एक झलक पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक जमले होते. या गर्दीत एका चाहत्याला भोवळ आली आणि तो जमिनीवर कोसळला. यामुळे तिथे उपस्थित असलेल्या लोकांमध्ये अफरातफरी माजली आणि चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती. इतर चाहत्यांनी त्या व्यक्तीला पाणी देऊन आणि गर्दीतून बाजूला काढून मदत करण्याचा प्रयत्न केला.
काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, रविवारी ते स्वतः चाहत्यांच्या भेटीला आल्याने त्यांच्या प्रकृतीबाबतच्या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. आपण पूर्णपणे ठणठणीत असल्याचे त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते.
अमिताभ बच्चन लवकरच 'कल्कि २८९८ एडी'च्या सीक्वलमध्ये अश्वत्थामाच्या भूमिकेत दिसतील. याशिवाय त्यांचा 'सेक्शन ८४' हा कोर्टरूम ड्रामा चित्रपटही प्रदर्शनासाठी सज्ज आहे, ज्याचे दिग्दर्शन रिभू दासगुप्ता यांनी केले आहे. बिग बी शिवाय डायना पेंटी, निमरत कौर आणि अभिषेक बॅनर्जी आहेत. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. त्याची रिलीज डेट अद्याप सांगण्यात आलेली नाही.
(video-filmfare x account वरून साभार)
अमिताभ बच्चन यांच्या संडे दर्शनची परंपरा
अनेक वर्षांपासून, मुंबईला भेट देणाऱ्या चाहत्यांसाठी 'जलसा' या त्यांच्या निवासस्थान बाहेरील अमिताभ बच्चन यांचे रविवारचे दर्शन हा एक मोठा कार्यक्रम ठरला आहे. दर आठवड्याला, शेकडो चाहते अभिनेत्याच्या निवासस्थानाबाहेर जमतात, त्यांना हात दाखवतात, फोटो काढतात आणि या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होतात. ही परंपरा अनेक चाहत्यांसाठी अत्यंत भावनिक बनली आहे, ज्यांपैकी काही जण या महान अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी वेगवेगळ्या शहरांतून आणि राज्यांतून प्रवास करतात.