समाजवादी पक्षाचे प्रमुख व खासदार अखिलेश यादव (Akhilesh Yadav) सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. राजकीय गाठीभेटींसोबतच त्यांनी रविवारी बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खानची (Salman Khan) भेट घेतली. पण, यामागे नेमकं कारण काय आहे, याची चर्चा सुरु झाली. ही भेट केवळ सदिच्छा भेट नव्हती. ती सलमानचे वडील सलीम खान यांच्या प्रकृतीशी संबंधित असल्याचे समोर आले आहे.
ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान (Salim Khan) यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ठीक नाही. त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ही माहिती मिळताच अखिलेश यादव यांनी वेळ काढून सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानी धाव घेतली. तिथे त्यांनी सलमानशी संवाद साधला आणि सलीम खान यांच्या उपचारांबद्दल माहिती घेतली. सलमानने यावेळी आपल्या वडिलांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असल्याचे सांगितले.
या भेटीनंतर, खुद्द अखिलेश यादव यांनी सलमान खान सोबतचा एक फोटो त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अखिलेश यादव सलमानचे वडील सलीम खान यांच्या प्रकृतीची विचारणा करण्यासाठी गेले होते. या भेटीमागे कुठलीही अधिकृत कारण समोर आले नाही.
अखिलेश यादव यांनी या भेटीचा फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिल- 'मुंबई मिलन'. एकाच फ्रेममध्ये दोघे एकत्र दिसत आहेत. हा फोटो काही तासातच व्हायरल झाला. तरी ही भेट कौटुंबिक आणि वैयक्तिक असल्याचे म्हटले जात आहे. यादव यांचे खान कुटुंबाशी जुने संबंध आहेत, त्यामुळे सलीम खान यांची विचारपूस करण्यासाठी ते गेले होते, असे वृत्त समोर आले आहे.
सलीम खान यांच्या प्रकृतीबद्दल अपडेट
सलीम खान यांना किरकोळ ब्रेन हॅमरेजमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.