पुढारी ऑनलाईन : २० वर्ष अभिनय कारकीर्द गाजवल्यानंतर अभिनेता रितेश देशमुख एका आगळ्या -वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ३० डिसेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'वेड' या चित्रपटाचे विषेश बाब म्हणजे, या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः अभिनेता रितेश देशमुख यांनी केले आहे. तसेच या चित्रपटाद्वारे अभिनेत्री जिनिलिया देशमुख या मराठी चित्रपटात पदार्पण करत आहेत. यापूर्वी जिनिलिया यांनी हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम अशा तब्बल ५ भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे व अभिनेत्री जिया शंकर इत्यादी कलाकार या चित्रपटात भूमिका साकारत आहेत.
आघाडीचे संगीतकार अजय अतुल यांनी 'वेड' चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. तर गाणी अजय – अतुल, गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. 'वेड' चित्रपटाची पटकथा रुषिकेश तुराई, संदीप पाटील, रितेश देशमुख यांनी लिहिली आहे. तसेच संवाद प्राजक्त देशमुख यांनी लिहिले आहेत. सिनेमॅटोग्राफी भूषणकुमार जैन यांनी केली आहे. संकलनाची जबाबदारी चंदन अरोरा यांनी पार पाडली आहे. संदीप पाटील हे कार्यकारी निर्माते आहेत. जिनिलिया देशमुख यांनी 'वेड' चित्रपटाची निर्मिती केली आहे.
रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांचा 'वेड' हा चित्रपट मुंबई फिल्म कंपनीची सहावी चित्रपट निर्मिती आहे. या चित्रपटातील पहिले गाणे ' वेड तुझा' प्रदर्शित झाले होते. त्या गाण्याला अल्पावधीत प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता 'वेड'च्या निर्मात्यांनी ' बेसुरी' हे दुसरे गाणे प्रदर्शित केले आहे. हे गीत वसुंधरा वी यांनी गायिले असून अजय अतुल यांनी संगीतबद्ध केले आहे. रितेश आणि जेनेलियाच्या आगामी 'वेड' चित्रपटाची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
हेही वाचलंत का?