मनोरंजन

प्रीत अधुरी : डबिंग आर्टिस्ट ते नायक… ; प्रवीण यशवंतचा थक्क करणारा प्रवास!

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : मायानगरी मुंबईत असंख्य तरुण उराशी मोठमोठी स्वप्न बाळगून येत असतात. काहींची पूर्ण होतात, तर काहींची या मुंबईच्या भाऊगर्दीत विरुन कायमची स्वप्नच बनून राहतात; पण काही जण  जिद्दीने आपलं स्वप्नं पूर्ण करतातच. मराठीतील आगामी 'प्रीत अधुरी' या सिनेमाचा नायक अर्थात प्रवीण यशवंत हे असंच काहीसं रसायन आहे. अभिनेता बनण्याचं स्वप्न त्याला इंजिनिअरिंगच्या पहिल्याच सेमिस्टरनंतर थेट मुंबईत घेऊन आलं. आणि 'प्रीत अधुरी' या आगामी मराठी सिनेमामधून त्यानं आपल्या कसदार अभिनयाच्या जोरावर तेच स्वप्न झोकात पूर्ण केलं.

अलिकडच्या काळात मराठी सिनेसृष्टीत अनेक दर्जेदार सिनेमे आले. 'प्रीत अधुरी' हा त्याच सिनेमांच्या रांगेतला आणखी एक दर्जेदार सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. फॅमिली ड्रामा-अ‍ॅक्शन-रोमान्स-सस्पेन्स-थ्रिलर असा फुल्ल ऑन मनोरंजनाचा तडका या सिनेमात आहे. पण त्यासोबतच प्रेक्षकांना अभिनेता प्रवीण यशवंत आणि अभिनेत्री प्रीया दुबे या कलाकारांची भन्नाट केमिस्ट्री देखील  पाहायला मिळणार आहे.

प्रवीण अभिनयाचं स्वप्न साकार करण्यासाठी मुंबईत आला. इथे बीए आणि एलएलबी करताना प्रवीणला डबिंगच्या काही संधी आल्या. या संधीचं सोनं करत आत्तापर्यंत प्रवीणने तब्बल १५ हजारांहून जास्त डबिंगचे प्रोजेक्ट्स पूर्ण केले आहेत. हिंदी, मराठी, इंग्रजी, भोजपुरी आणि उर्दू अशा तब्बल ५ भाषांमध्ये त्‍याने आपली डबिंगची कारकिर्द घडविली आहे.

हॉलिवूड, चायनिज, कोरियन, जपानी, स्पॅनिश, फारसी व उर्दू चित्रपट आणि मालिकांसाठी प्रवीणने आपला आवाज दिला आहे. याशिवाय काही हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये प्रवीणने आपल्या अभिनयाची झलक देखील दाखवली आहे. याच दरम्यान अभिनेता प्रवीण यशवंत आगामी 'प्रीत अधुरी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.

या चित्रपटाची अजून एक खासियत म्हणजे, त्याचं दिग्दर्शन जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका असणाऱ्या प्रियांका यांनी केलं आहे. चित्रपटाची कथा-पटकथा आणि संवाद शिव ओंकार, प्रकाशमणी तिवारी, संदीप मिश्रा, महादेव साळोखे यांनी लिहिले आहेत. संजय खापरे, मिलिंद दास्ताने, अरुण नलावडे, शमा निनावे आणि कमलेश सावंत हे दिग्गज कलाकारही या चित्रपटात दिसणार आहेत. सुप्रसिद्ध गायक जावेद अली, कुणाल गांजावाला, साधना सरगम, शाहीद माल्ल्या, रितु पाठक, खुशबू जैन आणि सुदेश भोसले यांनी आवाज दिला आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT