जेजुरी : अखेर भरले नाझरे धरण; 56 गावे व वाड्या-वस्त्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला | पुढारी

जेजुरी : अखेर भरले नाझरे धरण; 56 गावे व वाड्या-वस्त्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला

जेजुरी; पुढारी वृत्तसेवा: पुरंदर आणि बारामती तालुक्यांची वरदायिनी असलेले नाझरे (मल्हार सागर) धरण या वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे 100 टक्के भरले आहे. जून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 376 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. धरणावर अवलंबून असणार्‍या 56 गावे व वाड्या-वस्त्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. 788 दशलक्ष घनफूट पाणीसाठा क्षमता असलेल्या नाझरे जलाशयावर तीन प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आहेत. या योजनांतर्गत जवळपास 56 गावे व वाडी-वस्त्यांना पाण्याचा पुरवठा केला जातो.

यामध्ये जेजुरी शहर, जेजुरी एमआयडीसी, त्याचबरोबर इंडियन सिमलेक्स कंपनी, पारगाव माळशिरस प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पारगाव, माळशिरस, वाघापूर, सिंघापूर, गुरोळी, राजेवाडी, आंबळे, पिसर्वे, नायगाव, रिसे, पिसे, कोळविहिरे, मावडी क. प. व इतर गावे नाझरे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत नाझरे क. प., नाझरे सुपे ,जवळार्जुन, पांडेश्वर आदी गावे तर मोरगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत मोरगाव, आंबी, तरडोली, बाबुर्डी, लोणी भापकार, लोणी माळवाडी, कार्‍हाटी, जळगाव क. प., जळगाव सुपे कर्‍हावागज, अंजनगाव, ढोले मळा, आदी 56 गावांना व वाडीवस्त्यांचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नाझरे धरणातून होतो. ध

रण भरल्याने या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. धरणाच्या कालव्याच्या परिसरात असलेले 86 लहान मोठे पाझरे तलाव कालव्याच्या मधून पाणी सोडून भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे जलसंपदा अधिकारी विश्वास पवार यांनी सांगितले. पुरंदर तालुक्यात सप्टेंबर महिन्यानंतर माघारीचा मान्सून काळात चांगला पाऊस होतो. हा पाऊस झाल्यानंतर भूजल पातळी वाढून विहिरींना पाणी वाढत असते. जुलै व ॉगस्ट महिन्यात चांगला पाऊस झाल्याने शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे.

Back to top button