Aamne Saamne Marathi Natak: मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय 'आमने-सामने' नाटक गेल्या काही दिवसांपासून वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. नाटकातील कलाकार रोहन गुजर आणि केतकी पालव यांना अचानक बाहेर काढण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. मानधनवाढीच्या मुद्द्यावरून कलाकार आणि निर्मात्यांमध्ये सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोपही झाले.
हा वाद अद्याप चर्चेत असतानाच आता नाटकाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. रोहन आणि केतकी यांच्या जागी दोन नव्या कलाकारांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता 'आमने-सामने'च्या रंगमंचावर प्रेक्षकांना नवे चेहरे पाहायला मिळणार आहेत.
'आमने-सामने' नाटकात रोहन गुजरच्या जागी अभिनेता तेजस राऊत, तर केतकी पालवच्या जागी अभिनेत्री ऋजुता धारप दिसणार आहे. या दोघांच्या एन्ट्रीमुळे नाटकात आता नवी जोडी पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे तेजस राऊत या नाटकातून व्यावसायिक रंगभूमीवर पहिल्यांदाच पाऊल ठेवणार आहे. तर ऋजुता धारपचं हे दुसरं व्यावसायिक नाटक असणार आहे.
या नव्या संधीबाबत दोन्ही कलाकारांनी महाराष्ट्र टाइम्सशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. लोकप्रिय नाटकाचा भाग होण्याचा आनंद असला, तरी प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं आव्हानही त्यांच्यासमोर असणार आहे.
रोहन गुजरच्या जागी आता तेजस राऊत 'आमने-सामने'मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. तेजससाठी ही खास संधी आहे. कारण हे त्याचं पहिलंच व्यावसायिक नाटक आहे. नाटकाची मांडणी इतर नाटकांपेक्षा वेगळी असल्याने सुरुवातीला थोडं दडपण असल्याचं त्याने सांगितलं.
"माझं हे पहिलंच व्यावसायिक नाटक आहे, याचा मला आनंद आहे. 'आमने सामने'चा फॉर्म थोडा वेगळा असल्यानं दडपणही आहे. रंगभूमीवर संवाद म्हणण्याची तालीम कलाकार करत असतो. मात्र नाटकामध्ये मला प्रेक्षकांशी संवाद साधायचा आहे. त्याची सवय होईपर्यंत थोडंसं दडपण राहील," असं तेजस राऊत म्हणाला.
या नाटकात केवळ संवाद पाठ करून भूमिका साकारणं पुरेसं नाही, तर थेट प्रेक्षकांशी संवाद साधण्याचीही गरज आहे. त्यामुळे तेजससमोर एक वेगळं आव्हान असणार आहे. त्याच्या या नव्या प्रवासाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
दुसरीकडे, केतकी पालवच्या जागी अभिनेत्री ऋजुता धारपची निवड करण्यात आली आहे. ऋजुतासाठी हे दुसरं व्यावसायिक नाटक असणार आहे. पुन्हा एकदा रंगभूमीवर काम करण्याची संधी मिळाल्याने तिने आनंद व्यक्त केला आहे.
विशेष म्हणजे या नाटकाच्या निमित्ताने तिला लीना भागवत आणि मंगेश कदम यांच्यासारख्या अनुभवी कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळत आहे. त्यांच्या अनुभवातून अनेक गोष्टी शिकायला मिळत असल्याचं ऋजुताने सांगितलं.
"पुन्हा रंगभूमीकडे वळताना फार छान वाटतंय. लीना भागवत, मंगेश कदम यांसारख्या मातब्बर कलाकारांसोबत काम करताना त्यांच्या अनुभवाचा खूप फायदा होतोय. चित्रपट, मालिका आणि रंगभूमी अशा प्रत्येक माध्यमाची वेगळी आव्हानं असतात. नाटकात एकाही चुकीला जागा नसते. नाही तर प्रयोग फसतो. मी न चुकण्याची विशेष काळजी घेत आहे..."
ऋजुताच्या मते, नाटकात काम करताना प्रत्येक प्रयोगात पूर्ण तयारीनिशी उतरावं लागतं. चित्रपट किंवा मालिकांप्रमाणे एखादा प्रसंग पुन्हा सादर करण्याची संधी रंगभूमीवर मिळत नाही. त्यामुळे आपल्याकडून कोणतीही चूक होऊ नये, यासाठी ती विशेष मेहनत घेत आहे.
गेल्या काही दिवसांपासून 'आमने-सामने' नाटकातील कलाकार बदलण्याच्या निर्णयावरून सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. रोहन गुजर आणि केतकी पालव यांनी एक व्हिडीओ शेअर करत निर्मात्यांवर नाराजी व्यक्त केली होती.
दोघांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी नाटकासाठी मानधनवाढीची मागणी केली होती. त्यानंतर एका प्रयोगानंतर निर्मात्यांनी बैठक घेऊन त्यांना तोच त्यांचा शेवटचा प्रयोग असल्याचं सांगितलं. अचानक हा निर्णय कळाल्याने मोठा धक्का बसल्याचा दावा त्यांनी केला.
नाटकाचा शेवटचा प्रयोग असल्याची आधी कल्पना असती, तर तो अधिक आनंदाने सादर करता आला असता. सहकलाकार आणि प्रेक्षकांचा व्यवस्थित निरोपही घेता आला असता. मात्र तशी संधीच मिळाली नाही, अशी खंत रोहन आणि केतकी यांनी व्यक्त केली होती.
रोहन आणि केतकी यांच्या आरोपांनंतर नाटकाच्या निर्मात्या लीना भागवत आणि मंगेश कदम यांनीही सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत आपली बाजू स्पष्ट केली.
रोहन आणि केतकी यांनी तिसऱ्यांदा मानधनवाढीची मागणी केली होती. मात्र ही वाढ आर्थिकदृष्ट्या परवडणारी नसल्याने त्यांच्यासोबत काम थांबवण्याचा निर्णय घेतल्याचं लीना भागवत यांनी सांगितलं.
यानंतर रोहन आणि केतकी यांनी पुन्हा एक व्हिडीओ शेअर केला. तिसऱ्यांदा मानधनवाढ मागितल्याचं त्यांनी मान्य केलं. मात्र ही तिसरी मागणी आठ वर्षांच्या कालावधीत केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे मानधनवाढीचा मुद्दा आणि कलाकारांना नाटकातून बाहेर काढण्याची पद्धत यावरून दोन्ही बाजूंमध्ये मतभेद असल्याचं समोर आलं.
रोहन गुजर आणि केतकी पालव यांच्या नाटकातून बाहेर पडण्यावरून सुरू झालेल्या वादानंतर आता 'आमने-सामने'मध्ये नव्या कलाकारांचा प्रवास सुरू होत आहे. तेजस राऊत आणि ऋजुता धारप यांच्यासाठी ही महत्त्वाची संधी असणार आहे.
एकीकडे जुन्या कलाकारांच्या एक्झिटवरून चर्चा सुरू असताना दुसरीकडे नव्या जोडीसमोर प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं आव्हान आहे. आता तेजस आणि ऋजुता यांची रंगमंचावरील केमिस्ट्री कशी जुळते आणि 'आमने-सामने'च्या या नव्या जोडीला प्रेक्षक पसंत करतात का, याकडे मराठी नाट्यप्रेमींचं लक्ष लागलं आहे.