मनोरंजन

‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ चे उत्कंठावर्धक टीझर पोस्टर रिलीज

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

मराठी चित्रपटसृष्टीत वैविध्यपूर्ण विषय हाताळले जातात; परंतु सस्पेन्स थ्रीलर जॉनार मध्ये आजपर्यंत मोजकेच चित्रपट आले आहेत. लेखक – दिग्दर्शक अजित दिलीप पाटील हे लवकरच मराठी भाषेत सस्पेन्स थ्रीलर जॉनरमध्ये एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. त्या चित्रपटाचे नाव 'अ व्हॅलेंटाईन्स डे' असे आहे. या चित्रपटाचे उत्कंठावर्धक टीझर पोस्टर रिलीज करण्यात आले.

'अ व्हॅलेंटाईन्स डे' असे हटके नाव चित्रपटाचे आहे. या मराठी चित्रपटाची निर्मिती गोल्डन स्ट्राईप्स एन्टरटेन्मेंट आणि कियान फिल्म्स अँड एन्टरटेन्मेंट यांनी केलीय. सहयोगी निर्माते अनन्या फिल्म्स आहेत.

'आदमखोरी दुनियेत आपलं स्वागत आहे' अशी टॅगलाईन असलेल्या 'अ व्हॅलेंटाईन्स डे' चित्रपटाचे टीझर पोस्टर रिलीज झाले आहे. भारताचा नकाशा, ३ चा वॉटर मार्क यातून दिग्दर्शकाला नेमकं काय सांगायचं आहे? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडे दिवस वाट पहावी लागणार आहे.

'अ व्हॅलेंटाईन्स डे' या चित्रपटातून मराठीतील एक दिग्गज कलाकार २१ वर्षांनंतर मराठी चित्रपटसृष्टीत पुनरागमन करणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेते सुरेश विश्वकर्मा, अरुण कदम, संग्राम सरदॆशमुख यांच्यासह आणखी काही कलाकार असणार आहेत.  मुख्य भूमिकेत मराठीतील मोठ्या स्टार्सचा समावेश आहे. त्यांची नावे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.

चित्रपटातील एक गाणे प्रसिद्ध गीतकार संजय नवगिरे यांनी लिहिले आहे. दुसऱ्या क्लब सॉन्गला बॉलीवूड आणि साऊथमधील एका बड्या गायिकेने स्वरसाज चढविला आहे. डिओपी म्हणून डेब दत्त आणि साईनाथ माने जबाबदारी सांभाळणार आहेत. तसेच या चित्रपटाच्या टेक्निकल टीममध्ये बॉलीवूड व इजिप्शियन फिल्म इंडस्ट्री मधील लोकांचा समावेश आहे.

लेखक दिग्दर्शक अजित दिलीप पाटील म्हणाले, सगळेच म्हणतात, "आमचा चित्रपट वेगळा आहे;  पण प्रत्यक्षात तसं दिसत नाही. माझ्या या चित्रपटाचं नाव आणि त्याची टॅगलाईन वेगळपण म्हणजे काय आहे ते दाखवून देईल. मराठी चित्रपट फक्त मराठी नव्हे तर जगभरातील प्रेक्षकांनी बघावा अशी आमची इच्छा आहे."

चित्रपटाबद्दल बोलताना चित्रपटाचे निर्माते कॅप्टन फैरोज अनवर माजगावकर, कॅप्टन अमजद निराले, चीफ इंजिनिअर श्रीकांत धर्मदेव सिंह आणि सहनिर्माते सुनील यादव यांनी सांगितले की, "आम्हाला मराठी चित्रपटसृष्टीत रुळलेल्या वाटेवरून न जाता नवीन ट्रेंड आणायचा होता. 'अ व्हॅलेंटाईन्स डे' च्या निमित्ताने आम्ही नव्या दमाचा सिनेमा मराठीत आणणार आहोत. हा चित्रपट मराठीत निर्माण होणार आहे आणि ५ भाषेत डब होणार असुन तो आगामी मॉन्सून मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे".

कार्यकारी निर्माता सोमनाथ गिरी म्हणाले, कोरियन फिल्म इंडस्ट्रीसारखे चित्रपट मराठीत सुध्दा बनू शकतात. एक वेगळेपण या सिनेमात दाखवूच. तसेच नवा ट्रेंड मराठीत चित्रपटात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. या पोस्टर अनावरण सोहळ्यात मेघराज राजेभोसले(अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ),वैभव जोशी(निर्माता), सुभाष परदेशी(सुमित म्युझिक कंपनी), संजय ठुबे(संचालक), अण्णा गुंजाळ(निर्माता), अभिनेता सागर संत, अभिनेत्री स्वाती हनमघर, दत्तात्रय उभे, शिवाजीराव गदादे पाटील, प्रीतम पाटील, संजय म्हस्के आदी उपस्थित होते.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT