मुंबई; पुढारी ऑनलाईन
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शनिवारी (23 एप्रिल) खार पोलीस स्टेशन परिसरात हल्ला झाला. यानंतर त्यांची भाभा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. यामध्ये सोमय्या यांना झालेली जखम ही 0.1 सेमी असल्याचे वैद्यकीय तपासणीतून निष्पन्न झाले आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारे सूज किंवा रक्तस्राव नाही. त्यामुळे ही जखम गंभीर नसल्याचे वैद्यकीय अहवालात सांगण्यात आले आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या हे शनिवारी (23 एप्रिल) राणा दाम्पत्याला भेटण्यासाठी येणार असल्याचे समजले. यानंतर खार पोलीस स्टेशन बाहेर शिवसैनिकांनी घोषणाबाजी सुरु केली. पोलीस स्टेशनमधून परत जात असताना किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. पोलीस स्टेशनमधून परत जाताना पोलीस स्थानकाचं दार उघडताच, बाहेर असलेल्या 70-80 लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. शिवसैनिकांनी सोमय्यांच्या गाडीवर बाटल्या आणि चपला फेकल्या. याप्रसंगी यामध्ये सोमय्यांच्या गाडीची काच फुटून, त्यांना किरकोळ दुखापत झाली होती. या हल्ल्यात त्यांना 0.1 सेमीची जखम झाली असल्याचे समजत आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमय्यांना खरच जखम झाली आहे का ? की त्यांनी टोमॅटो सॉस लावला असावा, असे म्हणत किरीट सोमय्या यांच्या जखमेवर राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला होता. मात्र या हल्ल्यानंतर किरीट सोमय्या यांनी " माझ्यावर झालेला हल्ला हा ठाकरे सरकारकडून स्पॉन्सर्ड असल्याचे म्हटले होते. हे सर्व पोलिसांना माहीत होते. या हल्ल्याला संपूर्णपणे पोलीस आयुक्त संजय पांडे जबाबदार आहेत, असेही किरीट सोमय्या यांनी म्हटले होते.