सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील नामवंत मल्ल सिद्धाराम विश्वनाथ साखरे (वय 62) यांचे (बुधवार) रात्री अपघाती निधन झाले. सोलापूर- हैदराबाद महामार्गावर दोडी येथे जीप व ट्रक यांच्या अपघातात पैलवान साखरे यांचे निधन झाले.
1980 मध्ये सोलापुरात बाला रफीक शेख यांच्यासोबत झालेल्या उपमहापौर केसरी कुस्ती स्पर्धेत ते विजेते ठरले होते. पंजाबचे माजी कोल्हापुरातील शाहुपुरी तालीमीत त्यांनी कुस्तीचे धडे घेतले होते केली होती. पुणे येथे पोलीस दलात 34 वर्षाची सेवा करून सहाय्यक फौजदार पदावरून ते सेवानिवृत्त झाले होते. पुण्यातील गुंड गजा मारणे याच्यासह अनेक गुंडाना त्यांनी पोलिसी खाक्या दाखवून आवळले होते.
माजी मंत्री स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील, कुस्ती तालीम संघाचे अध्यक्ष रविकांत पाटील, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब मस्के आदींनी त्यांना कुस्तीसाठी पाठबळ दिले होते. कुस्तीमधील ते ऑल इंडिया चॅम्पियन होते.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी, पत्नी असा परिवार आहे. त्यांचे बंधू मल्लिनाथ साखरे हेसुद्धा पुणे पोलीस दलातून सहाय्यक फौजदार पदावर नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत, तर धाकटे बंधू चिदानंद साखरे हे सोलापूर पोलीस आयुक्तालय हवालदार पदावर कार्यरत आहेत. बोरामणी येथील दत्त मंदिराच्या पाठीमागे असलेल्या तालमीत त्यांनी सुरुवातीला कुस्तीचे धडे घेतले होते. यासाठी त्यांना भगवान मस्के, नागनाथ कवडे आदींचे सहकार्य लाभले होते. राज्याचे माजी पोलीस महासंचालक एस एस वीर्क यांनी त्यांना पोलीस दलात सेवा करण्याची संधी दिली होती. पोलीस दलात नियुक्त झाल्यानंतर सिद्धाराम साखरे यांनी क्रीडा क्षेत्रातील क्रीडापटूंना पोलीस दलात नोकरी मिळण्यासाठी पुढाकार घेतला होता.
हेही वाचलं का?