Nitin Gadkari on Maharashtra Politics 
Latest

आता वाहनांचे सायरनही वाजणार सुरेल आवाजात : नितीन गडकरी

अविनाश सुतार

नागपूर : पुढारी वृत्तसेवा : पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने इलेक्ट्रिक कार, स्कूटर, रिक्षा, ई-बस आल्या आहेत. माझ्याकडे पाण्यापासून निघणाऱ्या हायड्रोजनवर चालणारी कार आहे. पेट्रोल- डिझेलवर चालणारी वाहने लवकरच बंद होतील, हा प्रयत्न आहे. माणसाचे आरोग्य बिघडवण्याचे मुख्य कारण वायू, जल आणि ध्वनी प्रदूषण आहे. वाहनचालक विनाकारण हॉर्न, सायरन वाजवतात. या देशात नेत्यांचे लाल दिवे बंद केले. फक्त पोलिस, रुग्णवाहिकांना सायरन वाजवण्याचे अधिकार आहेत. मात्र, आता हे सायरनही भीतीदायक नव्हे, तर कर्णमधुर बासरीसारखे वाजतील, एकप्रकारे हॉर्नमधून वाद्यांचे आवाज ध्वनिप्रदूषण कमी करतील. त्यासाठी कायदा तयार केला जात असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

नागपुरातील एका खासगी कार्यक्रमात गडकरी बोलत होते. नागपुरातील नाग नदीसाठी २४०० कोटी मंजूर झाले आहेत. आपण आपल्या शहराला जल, वायू आणि ध्वनी प्रदूषणापासून मुक्ती देऊ. त्यासाठी लोकांच्या सहकार्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

गडकरी म्हणाले की, आपल्या देशात रस्ते सुरक्षेसाठी खूप कार्यक्रम होतात. अमिताभ बच्चन विना मोबदला काम करतात. रस्ते अपघातात मृत्यू होणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. दरवर्षी ५ लाख अपघात आणि दीड लाख मृत्यू होतात. मृतांमध्ये उच्चशिक्षित, डॉक्टर, युवकांची संख्या ६० टक्के आहे. रस्ते अपघात, पर्यावरण यासाठी आपली शिक्षण संस्था, सामाजिक संस्था यांनी पुढाकार घेऊन समाजाचे प्रशिक्षण आणि प्रबोधनही करायला हवे. सगळ्यांनी मिळून या समस्यांवर मात करू. ज्यामुळे लोकांचे जीवन सुखमय होईल. त्यासाठी शिक्षण संस्थांनी पर्यावरण, रस्ते सुरक्षा यासाठी काम करावे.

विशेषत: लहान मुलांना शिक्षण दिले पाहिजे. समाजाने पुढाकार घेतल्याशिवाय आपल्याला यश मिळणार नाही. पावसाळ्याआधी ३ मीटर उंचीचे वृक्ष सर्वांनी मिळून लावावे. हवा शुद्ध झाली तरच सर्वांचे आरोग्य सुधारेल, डॉक्टरांकडे जाण्याची आवश्यकता भासणार नाही. प्रत्येक वार्डात यंदा पाऊस येण्यापूर्वी ३ मीटर उंचीचे ५०० वृक्ष लावावेत. सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत ग्रीनरी वाढवण्याचा प्रयत्न करावा. पाणी देणे, वृक्ष वाचवणे हे काम संस्थांनी करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT