पुढारी ऑनलाईन डेस्क : Simple Energy : ओलाला टक्कर देणारी इलेक्ट्रिक बाईक लवकरच बाजारात येणार आहे. सिपल एनर्जी या कंपनीने दोन दिवसांपुर्वी याबाबत घोषणा केली आहे. त्यांनी तामिळनाडू सरकारसोबत मोठा करार केला आहे. या कंपनीने २ हजार ५०० कोटींचा सामंजस्य करार केला आहे.
कंपनीच्या दाव्यानुसार हा प्लॅन्ट भारतातील मोठा असणार आहे. दरम्यान मागच्या काही काळात ओला इलेक्ट्रिकनेही असाच दावा केला होता. ओलानेही हा प्लॅन्ट तामिळनाडूत उभारला आहे. ओलाच्या माहितीनुसार कंपनीमध्ये वर्षाला एक कोटी वाहने बाहेर पडतील असा प्रकल्प उभारला आहे.
सिंपल एनर्जी विक्रीमध्ये ओला इलेक्ट्रिकला टक्कर देण्यासाठी तयार असल्याचे सांगण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात, कंपनीच्या होसूरमधील शूलगिरीजवळ प्लांटमध्ये २०२२ च्या सुरुवातीपर्यंत दरवर्षी १० लाख बाईक्सचे उत्पादन करण्याचे उद्दिष्ट आहे.
दुसऱ्या टप्प्यात, धर्मपुरी येथे ६०० एकर जमिनीवर बांधल्या जाणाऱ्या दुसऱ्या प्लांटमध्ये सिंपल एनर्जी कडून १ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. दरम्यान या प्रकल्पामध्ये नाविन्यपूर्ण संशोधन आणि विकास केंद्र असणार आहे. तसेच जागतिक दर्जाचे टेस्टींग केंद्र आणि एक विक्रेता पार्क देखिल उभारण्यात येणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
सिंपल एनर्जीचे संस्थापक आणि सीईओ सुहास राजकुमार म्हणाले की, आम्ही भारतातील E2W (इलेक्ट्रिक टू-व्हीलर) बाजारात लवकरच आणणार आहे. पर्यावरणाला कोणताही बाधा पोहाचणार नाही याची आम्ही काळजी घेतली आहे.
इलेक्ट्रिक वाहनांची मागणी सातत्याने वाढत आहे. आगामी काळात इलेक्ट्रिक टू-व्हीलरची विक्री पारंपरिक स्कूटर आणि बाईकला मागे टाकेल, असा अंदाज बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या मागणीने अधिकाधिक उत्पादकांना आकर्षित केले आहे. प्रत्येक उत्पादक त्यांच्या उत्पादनांबद्दल तसेच उत्पादन क्षमतेबद्दल मोठे दावे करत आहे. सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटर हा असाच एक प्रयत्न आहे. सिंपल एनर्जीने या वर्षी ऑगस्टमध्ये सिंपल वन लाँच केले. कंपनीचा दाव्यानुसार सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटर एका पूर्ण चार्जवर २०३ किमी अंतर कापू शकते. ही ई-स्कूटर चार रंगात उपलब्ध असल्याचेही कंपनीचे म्हणणे आहे.