Latest

Shubman Gill GT Captain | कॅप्टन गिल! शुभमन गिल याच्याकडे गुजरात टायटन्सचे नेतृत्त्व, पंड्या MI मध्ये परतल्याने संघात मोठा बदल

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या गुजरात टायटन्सची साथ सोडून मुंबई इंडियन्स संघात परतल्याने आता गुजरात संघाचे नेतृत्व सलामीवीर शुभमन गिल याच्याकडे देण्यात आले आहे. आगामी इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०१४ च्या हंगामात शुभमन गिल गुजरात टायटन्सचा कर्णधार असेल. याबाबतची घोषणा Gujarat Titans ने त्यांच्या अधिकृत X अकाऊंटवर पोस्ट करत केली आहे. कॅप्टन गिल! कॅप्टन कॉलिंग… असा एक गिलचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. (Shubman Gill GT Captain)

संबंधित बातम्या 

आयपीएल २०२४ हंगामात गिलचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील हे पहिलेच नेतृत्व असेल. "गुजरात टायटन्सचे कर्णधारपद स्वीकारताना मला आनंद आणि अभिमान वाटतो. एका चांगल्या संघाचे नेतृत्व करण्यासाठी माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल फ्रँचायझीचे आभार," असे गिलने म्हटले आहे. "आमच्याकडे दोन अपवादात्मक हंगाम आले आहेत आणि मी संघाचे नेतृत्व करण्यास उत्सुक आहे." असेही त्यांनी नमूद केले आहे.

ESPNcricinfo ने दिलेल्या वृत्तानुसार, गुजरात टायटन्सचे क्रिकेट संचालक विक्रम सोलंकी यांनी म्हटले आहे की, "शुभमन गिलचा खेळ गेल्या दोन वर्षांत उंचावला आहे. आम्ही त्याला केवळ फलंदाज म्हणूनच नव्हे तर त्याच्याकडील नेतृत्त्व गूणही पाहिले आहेत. त्याच्या मैदानावरील योगदानामुळे गुजरात टायटन्सला २०२२ मध्ये आयपीएलचे विजेतेपद मिळाले. यामुळे गुजरात टायटन्स एक मजबूत संघ म्हणून उदयास येण्यास मदत झाली. त्याची परिपक्वता आणि कौशल्य त्याच्या मैदानावरील कामगिरीवरून दिसून येते आणि आम्ही शुभमन सारख्या तरुण नेतृत्त्वासोबत नवीन प्रवास सुरू करण्यास उत्सुक आहोत." (Shubman Gill GT Captain)

गिलची आयपीएल कारकीर्द

२०१८ मध्ये कोलकाता नाइट रायडर्स सोबत गिलने आयपीएल कारकीर्दीची सुरुवात केली होती. गिलला २०२२ च्या लिलावापूर्वी टायटन्सने ७ कोटी रुपयांना करारबद्ध केले होते. त्याने २०२२ मधील १६ सामन्यांमध्ये ४८३ धावा केल्या होत्या. त्याने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात नाबाद ४५ धावा करून टायटन्सला पदार्पणाच्या हंगामातच विजेतेपद मिळवून दिले होते. आयपीएल २०२३ मध्ये १७ डावांमध्ये ८९० धावांसह तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. ज्यात तीन शतकांचा समावेश होता. गेल्या हंगामात टायटन्सला अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

गिल सध्या केएल राहुल, शिखर धवन, विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसच्या मागे सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पाचव्या स्थानावर आहे. गिल नेतृत्त्व करत असलेल्या टायटन्स संघात केन विल्यमसन, रशीद खान, डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड आणि रिद्धिमान साहा सारख्या अनेक अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. याआधी दुलीप आणि देवधर ट्रॉफीमध्ये देशांतर्गत संघांचे नेतृत्व करण्याचा अनुभवही त्याच्याकडे आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT