Joe Root Out of IPL : जो रूट आयपीएलमधून बाहेर! राजस्थान रॉयल्सला धक्का | पुढारी

Joe Root Out of IPL : जो रूट आयपीएलमधून बाहेर! राजस्थान रॉयल्सला धक्का

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटने आयपीएल 2024 मधून आपले नाव मागे घेतले आहे. या इंग्लिश फलंदाजाने आयपीएल रिटेन्शन लिस्टच्या अंतिम मुदतीपूर्वी अचानक निर्णय घेत सर्वांनाच धक्का दिला. तो राजस्थान रॉयल्स संघाचा एक भाग होता. या फ्रँचायझीने शनिवारी (25 नोव्हेंबर) एक निवेदन जारी करून ही माहिती दिली.

आयपीएलमधून माघार घेणारा रूट हा इंग्लंडचा दुसरा क्रिकेटर आहे. त्याच्या आधी अष्टपैलू बेन स्टोक्सनेही आयपीएलमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला होता. खरेतर रुटने 2023 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. आरआरने त्याला 1 कोटी रुपयांना विकत घेऊन आपल्या संघाचा भाग बनवले होते. मात्र, गेल्या मोसमात त्याला केवळ तीन सामने खेळण्याची संधी मिळाली होती. या तीन सामन्यांमध्ये त्याने 15 चेंडूंचा सामना केला आणि एकूण 10 धावा केल्या.

कुमार संगकारा काय म्हणाला?

राजस्थान रॉयल्सचा संचालक कुमार संगकाराने एक निवेदन जारी करून जो रूटच्या निर्णयाची माहिती दिली आहे. तो म्हणाला, ‘खेळाडूंना कायम ठेवण्याबाबतच्या चर्चेदरम्यान, जो रूटने आम्हाला सांगितले की तो पुढील आयपीएल हंगामात भाग घेणार नाही. आम्ही त्याच्या निर्णयाचा आदर करतो. तो फार कमी काळ आमच्यासोबत राहिला. मात्र यावेळी त्याने फ्रँचायझी आणि खेळाडूंमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण केले. त्याच्या उर्जेची कमतरता भासेल.’

राजस्थान रॉयल्सने काय म्हटले?

जो रूटला भविष्यासाठी शुभेच्छा देताना राजस्थान रॉयल्सच्या वतीने म्हटलंय की, ‘32 वर्षीय रूटने राजस्थान रॉयल्सच्या संघात सखोलता आणि अनुभव आणला आहे. ध्रुव जुरेल, यशस्वी जैस्वाल आणि रियान पराग या युवा खेळाडूंना रूटच्या अनुभवातून बरेच काही शिकता आले. संघ सहकारी जोस बटलर आणि युझवेंद्र चहल यांच्यासोबत त्याचे चांगले बाँडिंग होते. त्याने राजस्थान रॉयल्ससोबत व्यतीत केलेला काळ आमच्यासाठी आठवणींच्या स्वरूपात नेहमीच राहिल.’

Back to top button