नगर, पुढारी वृत्तसेवा: नगर-सोलापूर महामार्गावर सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे बुर्हानगर पाणी योजनेची जलवाहिनी मागील सहा महिन्यांत तब्बल 55 वेळा फुटल्याने या भागातील नागरिकाना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. जलवाहिनीचे काम तातडीने पुर्ण केले नाही तर शिवसेना स्टाईल संबंधित ठेकेदाराला झोडपणार असल्याचा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी दिला आहे.
नगर-सोलापूर मार्गावर रस्ता रुंदीकरण जेएचव्ही कंपनी मार्फत युद्धपातळीवर चालू आहे. या रस्त्यावरुन बुर्हाणनगर पाणी योजनेची जलवाहिनी गेली. या जलवाहिनीतून दरेवाडी, वाटेफळ, वांळुज, शिराढोण,वाटेफळ, दहिगाव, साकत, पारगाव, रुईछत्तीसी, या आठ गावाना पाणीपुरवठा होत आहे. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे या भागातील जलवाहिनी वारंवार फुटत आहे. जेसीबी चालकाकडून जलवाहिनीवर जोराने घाव टाकल्याने ती वारंवार फुटत आहे.
परिणामी जलवाहिनीचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे या भागातील पाणी पुरवठा वारंवार बंद होत आहे . एक लिकेज काढण्यासाठी एक दिवस लागत आहे. दर दोन-तीन दिवसांनी ही जलवाहिनी फुटत आहे त्यामुळे या भागात पाणी सोडता येत नाही. आतापर्यंत सहा महिन्यांत दहा वेळेस पाणी सोडण्यात आले.विनाकारण पाणीपट्टी भरण्याचा लोड नागरिकाना सहन करावा लागत आहे. या भागात क्षारयुक्त पाणी असल्यामुळे टँकरने, तसेच जारचे पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकावर आली आहे.
गुरुवारी ९ जून रोजी शिराढोण येथे जलवाहिनी फुटली असता शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संदेश कार्ले सह सेनेचा युवा सेनेचे तालुकाअध्यक्ष प्रवीण गोरे, सागर मते, सोमनाथ गोरे, भाऊ बेरड, बाबा करांडे, विलास शेडाळे, नाना गायकवाड यांनी या ठिकाणी भेट देऊन संबंधित ठेकेदाराला चांगलीच समज दिली. परत जलवाहिनी फुटणार नाही, याची काळजी घेऊ असे ठेकेदारांने सांगितले. परत जलवाहिनी फुटली, तर संबधीत ठेकेदार सहीत कर्मचार्याना झोडपून काढू असा लेखी स्वरूपात इशारा यावेळी शिवसैनिकांनी दिला.