लखनौ, पुढारी ऑनलाईन : यूपी निवडणूक जवळ येत असून अखिलेश यादव आणि-शिवपाल यादव एकत्र आले आहेत. पाच वर्षांपूर्वी काका पुतण्यातील वादामुळे सत्ता गमावलेल्या अखिलेश यादव यांनी पुन्हा एकदा यू टर्न घेत काका शिवपाल यांना सोबत घेतले आहे. अखिलेश यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी काका शिवपाल यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला असून आगामी निवडणुकीत प्रगतीशील समाजवादी पक्ष आणि समाजवादी पक्ष एकत्र लढेल असे जाहीर केले.
सत्तेच्या वादातून शिवपाल आणि अखिलेश यांच्यात मोठा वाद झाला. शिवपाल यांना मंत्रिमंडळातून हटविण्यापासून ते अनेकदा भर सभेत माइक हिसकावून घेण्यापर्यंत हा वाद पोहोचला होता. सपामधील दुफळीचे जाहीर प्रदर्शन झाल्याने राज्यातील सत्ता तर गमावलीच शिवाय लोकसभा निवडणुकीतही मोठा झटका बसला. त्यामुळे अखिलेश यांच्यावर दबाव वाढत होता. शिवपाल यांच्या पक्षाशी युती करण्याबाबत चर्चा सुरू होती.
गुरुवारी अचानक अखिलेश हे शिवपाल यादव यांच्या घरी गेले. त्यावेळी शिवपाल यांना नमस्कार करताच ते भावूक झाले. त्यांनी अखिलेश यांना अलिंगन देत दीर्घ चर्चा केली. जवळपास १ तास ही बैठक सुरू होती. त्यानंतर अखिलेश यांनी ट्विट करून प्रसपा आणि सपा यांच्यात युती झाल्याची घोषणा केली.
त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले, प्रसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांशी चर्चा झाली. या चर्चेत युतीवर शिक्कामोर्तब झाले. प्रादेशिक पक्षांना सोबत घेण्याची समाजवादी पक्षाची परंपरा आता मजबूत होत आहे. सपा आणि अन्य सहकारी पक्ष ऐतिहासिक विजयाच्या दिशेने जात आहे.
पक्षाचे होणार विलिनीकरण
वास्तविक शिवपाल हे समाजवादी पक्षाचेच आमदार आहेत. त्यांनी २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक लढविली होती मात्र, त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यांनी १२ ऑक्टोंबरपासून सामाजिक परिवर्तन रथयात्रा सुरू केली होती. यादरम्यान त्यांनी समाजवादी पक्षाकडे युतीसाठी हात पुढे केला होता. आत्ताची युती ही पुढील काळात पक्षाच्या विलीनीकरणात होईल, असे बोलले जात आहे.
हेही वाचा :