Latest

‘जनाब देवेंद्र फडणवीस’ त्यावेळी चादर चढवताना स्वाभिमान झुकला नाही का ? आता सेनेकडून वार !

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : औरंगाबाद महापालिकेसाठी एमआयएमने महाविकास आघाडी सरकारला आघाडी करण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर एकच रणकंदन माजले आहे. महाविकास आघाडी सरकारने यावर प्रतिक्रिया देण्यापूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गौप्यस्फोट करून एकच खळबळ उडवून दिली. त्यांनी जनाब बाळासाहेब ठाकरे असा उल्लेख करत शिवसेनेवर बोचरी टीका केली.

आता या टिकेला शिवसेनेकडून सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा जनाब उल्लेख असलेला फोटो ट्विट केला आहे. त्याचबरोबर मुस्लीम टोपी घातलेला फोटो शेअर करत फडणवीस यांना टॅग करत जनाब देवेंद्र फडणवीसजी तेव्हा तुम्ही जनाब शब्दाबद्दल आक्षेप घेतल्याचे आठवत नाही. चादर चढवताना आपला स्वाभिमान वाकला/झुकला नाही का? आताच का या शब्दाबद्दल एवढा राग? अरे हो 105 आमदार निवडूनही भाजप सत्तेत नाही, यामुळे तुमची अस्वस्थता आहे. नाही का? असे ट्विट केले आहे.

हे तर भाजपचेच षड्यंत्र : उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडीसोबत एमआयएमचा आघाडीचा प्रस्ताव हे भाजपचेच षड्यंत्र आहे. शिवसेनेला हिंदूविरोधी व मुस्लिमधार्जिणे ठरविण्यासाठी भाजपने हा डाव आखला आहे. एमआयएम ही भाजपचीच बी टीम आहे. त्यामुळे भाजपचा हा डाव मंगळवारपासून सुरू होणार्‍या शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून उधळून लावा, भाजपचे हिंदुत्व कसे थोतांड आहे ते जनतेला घरोघरी जाऊन सांगा. शिवसैनिक हिंदुत्वाचा अंगार असतो हे त्या भंगारांना दाखवून द्या, अशा शब्दांत ठाकरेंनी भाजपला लक्ष्य केले.

युतीची शक्यता फेटाळली

औरंगजेबाच्या थडग्यावर डोके टेकवणार्‍यांसोबत शिवसेना कदापि जाणार नाही, अशी जळजळीत टीका करत शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'एमआयएम'बरोबर युतीची शक्यता रविवारी फेटाळून लावली. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील कोणत्या पक्षासोबत आघाडी करण्याचा अधिकार राज्याच्या युनिटला नाही, असे सांगत 'एमआयएम'चे खासदार इम्तियाज जलील यांनी दिलेला आघाडीचा प्रस्ताव धुडकावला. 'एमआयएम'ही भाजपप्रमाणे कट्टरतावाद पसरविणारा पक्ष असल्याने काँग्रेसचा त्यांना विरोध आहे, अशी भूमिका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मांडल्याने 'एमआयएम'शी महाविकास आघाडीची युती होणार नाही हे स्पष्ट झाले आहे.

हे ही वाचलं का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT