Latest

Maharashtra Politics : शिंदेंसोबत गेलेले आमदार-खासदार ईडीच्या फेऱ्यातच; केसेस मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे तगादा

मोहन कारंडे

मुंबई; नरेश कदम : ईडीच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले शिवसेनेचे काही खासदार आणि आमदार यांच्या विरोधात ईडीने दाखल केलेले गुन्हे अजूनही मागे घेतलेले नाहीत. त्यामुळे हे गुन्हे मागे घेण्यात यावेत, यासाठी या खासदार आणि आमदारांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे तगादा लावला आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना, शिवसेनेच्या काही खासदार आणि आमदार यांच्याविरोधात ईडीने आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. काही नेत्यांच्या विरोधात न्यायालयात आरोपपत्रे दाखल करण्यात आली आहेत. वाशिमच्या खासदार भावना गवळी, अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसुळ, आमदार प्रताप सरनाईक, मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव आदी नेते ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. ईडीची चौकशी आणि अटक यांच्यापासून वाचण्यासाठी अनेक नेते शिंदे यांच्यासोबत आले. शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडाला एक वर्ष उलटून गेले असून या नेत्यांवरील गुन्हे अजूनही कायम आहेत. या नेत्यांची ईडी चौकशी थांबली असली तरी गुन्हे कायम आहेत. तसेच न्यायालयात आरोपपत्र कायम आहेत. त्यामुळे गुन्हे आणि न्यायालयातील आरोपपत्र मागे घेण्यात यावेत, यासाठी या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अलिकडेच भेट घेतली. पुन्हा निवडणुकीला सामोरे जायचे आहे त्यापूर्वी हे गुन्हे मागे घेण्यात यावेत, असे गाऱ्हाणे या नेत्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना घातले आहे.

आश्वासनांवर बोळवण

आतापर्यंत आपल्यावरील गुन्हे मागे घेण्याबाबत या नेत्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची अनेकवेळा भेट घेतली आहे. परंतु प्रत्येकवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बोलून आपण या विषयातून मार्ग काढू, असे आश्वासन देऊन मुख्यमंत्री शिंदे हे या नेत्यांची बोळवण करीत आहेत. काही दिवसांपूर्वी या नेत्यांनी शिंदे यांची भेट घेतली. तेव्हाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बोलतो, असा शब्द शिंदे यांनी या नेत्यांना दिला आहे. गुन्हे मागे घेतले जात नसल्याने या नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात सरकार बदलले तर पुन्हा ईडीचा फेरा आपल्या मागे लागू शकतो, अशी भीती या नेत्यांना सतावत आहे. तुमच्यावरील गुन्हे मागे घेतले जातील, असे आश्वासन भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने या नेत्यांना दिले होते. परंतु आता दीड वर्ष होत आले तरी गुन्हे मागे घेतलेले नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांच्या अपात्रतेबाबत डिसेंबरअखेर विधानसभा अध्यक्ष निकाल देणार आहेत. त्यामुळे शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे.

काय आहेत आरोप ?

आनंदराव अडसूळ : सिटी बँक घोटाळा

सिटी बँक घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांची ईडीकडून सप्टेंबर २०२१ पासून चौकशी केली जात आहे. आमदार रवि राणा यांच्या तक्रारीनंतर ईडीने अडसुळ यांना समन्स पाठवले होते. मात्र शिवसेना पक्षाचा एक गट भाजपसोबत सत्तेत सामील झाल्यावर आणि अडसुळांनी या गटाला साथ दिल्यावर चौकशी वा अटक यांच्याबाबत ईडीने कोणतीही सक्रिय भूमिका घेतल्याचे दिसले नाही.

प्रताप सरनाईक एनएसईएल गैरव्यवहार

एनएसईएल आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आमदार प्रताप सरनाईकही सहभागी असल्याचा ईडीचा आरोप आहे. ईडीने त्यांची ११९. ३५ कोटी रुपयांची संपत्ती गेल्यावर्षी जप्त केली आहे. यामध्ये सरनाईक यांचा हिरानंदनी येथील राहता फ्लॅट आणि मीरारोडमधील जमिनीचा समावेश असल्याचे समजते. या कारवाईपासून वाचण्यासाठी भाजपशी जुळवून घेण्याची विनंती तेव्हा सरनाईकांना तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली होती.

यशवंत जाधव : विदेशातील गुंतवणुकीबाबत चौकशी

यशवंत जाधव यांनी परदेशात केलेल्या गुंतवणूक प्रकरणात त्यांची ईडीकडून चौकशी होत आहे. ईडीकडून यशवंत जाधव यांना फेमा कायद्यांतर्गत समन्स बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यशवंत जाधव यांचे भायखळ्यातल्या बिलखाती चेम्बर्स या इमारतीतील ३१ फ्लॅट्स आणि वांद्रेतील ५ कोटीचा फ्लॅट आयकर खात्याकडून जप्त करण्यात आला आहे. याशिवाय भायखळामधील इम्पिरियल क्राउन हॉटेल आहे जे यशवंत जाधव यांनी आपल्या सासूच्या नावे खरेदी केले होते.

काय आहे भावना गवळींचे चौकशी प्रकरण?

खासदार भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्टमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप वाशीम जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्ते हरीश सारडा यांनी केला होता. याअंतर्गत ईडी ने सप्टेंबर २०२१ मध्ये गवळी यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले. होते. त्यानंतर 'ईडी'ने या प्रकरणात सईद खान या व्यक्तीला अटक केली आहे. 'गवळी यांच्या ट्रस्टमध्ये सईद खान हे संचालक आहेत. या ट्रस्टला बेकायदेशीररित्या कंपनीमध्ये रूपांतरित करण्यासाठी सईद खान यांनी मध्यस्थी केली. त्यासाठीच धर्मदाय आयुक्त कार्यालयातदेखील गैरव्यवहार झाला. एकूण घोटाळा १८ कोटी रुपयांचा आहे. शिवाय सात कोटी रुपयांच्या रोख रकमेचादेखील गैरवापर करण्यात आला, अशी माहिती ईडीला मिळाली आहे. त्यासंबंधी अधिक चौकशीसाठीच गवळी यांना तीनवेळा समन्स बजावण्यात आले होते. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. आता गवळी भाजपसोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या गटात असून ईडी, सारडा आणि सोमय्या हे सारेच आता शांत आहेत.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT