देहू : पुढारी ऑनलाईन : ज्या शिळेवर बसून तुकोबारायांनी १३ दिवस कठोर उपासना केली ती शिळा भक्ती आणि ज्ञानाची आधारशिळा असून, केवळ भक्तीचेच नव्हे तर भक्तीच्या शक्तीचे हे केंद्र आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांप्रति आपला आदरभाव व्यक्त केला.
मंगळवारी दुपारी देहू येथील संत तुकाराम हाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त व मान्यवर उपस्थित होते.
मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठी अभंगांनी करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली. मोदी यांनी आपल्या भाषणात तुकोबांच्या कार्याचा आढावा घेताना त्यांच्या अभंगांनी आणि त्यांच्या कार्याने सामज घडविण्याचे काम केल्याचे सांगितले. जो भंग होत नाही आणि जो शाश्वत असतो तो अभंग…तुकोबाराय आणि महाराष्ट्रातील संतांच्या परंपरेने शाश्वततेला सुरक्षित ठेवत राष्ट्राला गतीशीलहीठेवले. त्यांच्या अभंगांनी अनेक पिढ्यांना मार्गदर्शन तर केलेच पण ते देशाच्या भविष्याचा आशेचा किरणही बनले, असे मोदीम्हणाले.
छत्रपती शिवराय आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांसाठीही तुकोबारायांचे अभंग उर्जा स्त्रोत राहिल्याचे सांगतानाच 'भेदाभेद अमंगळ …' या तुकोबांच्च्या अभंगाचे उदाहरण देताना त्यांनी राष्ट्रीय एकात्मता कायम राखण्यासाठी, देशातील समानतेच्या तत्वाचा तो आधार असल्याचे सांगितले.
तुकाराम महाराजांनी जीवनात भूक आणि दुःख पाहिले. संकटकाळात कुटुंबाच्या संपत्तीला जनसेवेसाठी समर्पित केले. त्यांचे कार्य भविष्यासाठी आशेचा किरण आहे, तर ही शिळा त्यांच्या बोध आणि वैराग्याची साक्ष आहे. संतांच्या अभंगवाणीने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली. आज देश सांस्कृतिक मूल्यांच्या आधारे पुढे जात असताना अभंग समाजाला मार्गदर्शन करीत आहेत. मराठी संतांच्या अभंगवाणीतून नित्यनवी प्रेरणा मिळते. तुकाराम महाराजांनी माणसात भेदभाव करणे मोठे पाप म्हटले आहे. समाजासाठी हा संदेश महत्वाचा आहे असेही ते म्हणाले.
संत भिन्न परिस्थितीत समाजाला मार्गदर्शन करतात. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषांच्या जीवनात संत तुकाराम यांच्यासारख्या संतांची महत्वाची भूमिका आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर कैदेत असताना तुकाराम महाराजांचे अभंग म्हणत. संत तुकारामांची करुणा, दया आणि सेवेचा बोध त्यांच्या अभंगाच्यारुपाने आजही आपल्यात आहे. या अभंगांनी अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली. आजही हे अभंग आपल्याला ऊर्जा देतात, मार्गदर्शन करतात. ऐक्यासाठी संत विचारांच्या प्राचीन परंपरेला जपावे लागेल.
प्रयत्नातून अशक्याला शक्य करता येते हे तुकाराम महाराजांनी सांगितले आहे. देशात पर्यावरण, जलसंरक्षण आणि नदी वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यात सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. आपल्या अध्यात्मिक परंपरेशी हे विषय जोडल्यास पर्यावरणाचे मोठे काम होईल. सेंद्रिय शेतीला प्रत्येक शेतापर्यंत पोहोचविण्यासाठी मिळून प्रयत्न करावे लागतील. योग ही भारताची जगाला देणगी आहे असे सांगून आंतरराष्ट्रीय योग दिवसात सर्वांनी सहभाग व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, दरवर्षी होणाऱ्या आषाढीवारीसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या पालखी मार्गाच्या कामाला गती देण्यात आल्याचे सांगतानाच या कामासाठी ११ हजार कोटी रुपये खर्चकरण्यात येत असल्याची माहिती मोदी यांनी दिली. संत ज्ञानेश्वर माऊली पालखी मार्गाचे ५ टप्प्यात तर तुकोबांच्या पालखी मार्गाचे काम ३ टप्प्यात पूर्ण करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.