पुढारी ऑनलाईन : भारतीय शेअर बाजारात आज तेजीचे वातावरण राहिले. सेन्सेक्सची आठव्या दिवशी वाढ कायम राहिली. सेन्सेक्स (Sensex) २४२ अंकांच्या वाढीसह ६१,३५४ वर बंद झाला. तर निफ्टी (Nifty) ८२ अंकांनी वाढून १८,१४७ वर स्थिरावला. अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह बँक बुधवारी व्याजदरवाढीबाबत निर्णय जाहीर करणार आहे. याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, सकारात्मक जागतिक संकेत आणि कंपन्यांच्या मार्च तिमाहीतील कमाईच्या जोरावर भारतीय शेअर बाजारात आज सलग आठव्या सत्रांत तेजी राहिली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स २०० अंकांनी वाढला होता. तर निफ्टी १८ हजारांवर होता. त्यानंतर बाजार बंद होईपर्यंत ही तेजी कायम राहिली. बाजारात आज चौफेर खरेदी पाहायला मिळाली. आजच्या ट्रेडिंग सत्रातील तेजीत बँकिंग, फायनान्सियल आणि IT स्टॉक्स आघाडीवर राहिले. (Share Market Closing Bell)
सेन्सेक्सवर टेक महिंद्रा, एनटीपीसी, टाटा स्टील, मारुती, इन्फोसिस, पॉवर ग्रिड, ॲक्सिस बँक, रिलायन्स, विप्रो आणि एल अँड टी टॉप गेनर्स होते. तर सन, फार्मा, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा मोटर्स, कोटक बँक आणि बजाज फायनान्स हे घसरले होते.
मार्च तिमाहीत कंपनीने निव्वळ नफ्यात १४ टक्क्यांनी वार्षिक वाढ नोंदवल्यानंतर M&M फायनान्सचे शेअर्स ४ टक्क्यांनी वाढले. दरम्यान, चौथ्या तिमाहीतील निकालानंतर RBL बँकेचे शेअर्स सुमारे ४ टक्क्यांनी घसरले.
अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर बीएसईवर आजच्या व्यवहारात ५ टक्क्याच्या सर्किटवर ९९८.१ रुपयांवर पोहोचला. कंपनीने मार्च तिमाहीतील नफ्यात मागील वर्षीच्या तुलनेत वाढ नोंदवली. या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न वाढून २,९८८ कोटी झाले आहे, जे मागील वर्षीच्या याच कालावधीत १,५८७ कोटी होते. तर नफा मागील आर्थिक वर्षातील ४८९ कोटींच्या तुलनेत २०२२-२३ या आर्थिक वर्षात ९७३ कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे.
IDFC फर्स्ट बँकेचा शेअर BSE वर आज ६ टक्के वाढून ६५.२ रुपयांवर पोहोचला. या बँकेचा नफा (PAT) मार्च तिमाहीत वार्षिक १३४ टक्के वाढून ८०३ कोटी झाला. बँकेचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक तिमाही नफा आहे.
जेपी मॉर्गन चेसने आर्थिक संकटात सापडलेली फर्स्ट रिपब्लिक बँक ताब्यात घेण्याच्या निर्णयानंतर अमेरिकेतील शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. परिणामी डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज निर्देशांक ०.१ टक्के घसरून ३४,०५२ वर बंद झाला. तर एस अँड पी किचिंत घसरून ४,१६८ वर बंद झाला. नॅस्डॅक कंपोझिट १२,२१२ वर स्थिरावला. आशियाई बाजारात मात्र काही प्रमाणात तेजीचे वातावरण राहिले. टोकियो, सेऊल, तैपेई, क्वालालंपूर, सिंगापूर आणि मनिला येथील निर्देशांक वधारले होते. तर सिडनी, वेलिंग्टन, जकार्ता आणि बँकॉक येथील शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली.
परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा (FII) भारतीय बाजारात ओघ वाढत असून ते भारतीय शेअर्सचे निव्वळ खरेदीदार राहिले, त्यांनी शुक्रवारी ३,३०४ कोटी रुपयांची शेअर्सची खरेदी केली. दरम्यान, एफआयआयने एप्रिलमध्ये १३,५४५ कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची खरेदी केली आहे.
हे ही वाचा :