ईपीएफमधून पैसे काढताय? | पुढारी

ईपीएफमधून पैसे काढताय?

आपण ऑनलाईनवर ईपीएफ काढण्यासाठी क्लेम केला आणि त्यासाठी चार दिवस वाट पाहिली. आज ना उद्या दावा मंजूर होईल, या आशेने आपण राहतो. पण नंतर तपासले तर दावा फेटाळल्याचे निदर्शनास येते. दावा नाकारण्याचे कारण समजल्यानंतर पुन्हा अर्ज केला जातो. पण त्यावेळीही दावा नामंजूर करण्यात येतो.

ऑनलाईनवर ईपीएफ काढण्यासाठी केलेला दावा नामंजुरीचा अनुभव अनेकांना आला असेल. याबाबत ईपीएफओकडे तक्रारही केली तरी त्यावर कोणताही तोडगा निघाला नाही. या तक्रारीची दखल घेत क्लेम सेटलमेंटमध्ये सुधारणा करण्यात आल्या असून, सरकारने एक नवीन आदेश जारी केला आहे. यानुसार आता नोकरदारांसाठी ईपीएफओतून पैसे काढणे सुलभ झाल्याचे सांगण्यात आले. क्लेम सेटलमेंट नियम शिथिल केले असून, अनेकदा नाकारला जाणारा प्रस्ताव आता पुन्हा फेटाळला जाणार नाही, हे निश्चित.

दावा नाकारला जाणार नाही

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, सर्व ईपीएफ खातेधारकांचे क्लेम तातडीने निकाली काढावे, त्यांचा दावा लवकरात लवकर मंजूर करावा, असे सांगितले गेले आहे. कामगार मंत्रालयाने म्हटले की, अर्ज करणार्‍या व्यक्तीचा डेटा बेस हा ईपीएफओकडे असलेल्या माहितीशी मिळताजुळता असेल, तर त्याचा क्लेम अन्य कोणत्याही कारणांमुळे नाकारता येणार नाही. ईपीएफओ कार्यालयाने संबंधितांना त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी, अशी तंबी दिल्याचे बोलले जात आहे.

ईपीएफ विड्रॉलच्या नियमात बदल

खातेधारकांचा ईपीएफ दावा हा सहजासहजी नाकारला जाणार नाही. गेल्या काही वर्षांपासून खातेधारकांनी क्लेम रिजेक्टबाबत तक्रारी केल्या. पैसे काढण्याच्या कडक नियमांमुळे विड्रॉलची प्रक्रिया ही खोळंबली जायची. पण सरकारने त्यावर तातडीने पावले उचलत ईपीएफओला क्लेम रिजेक्ट न करण्याबाबतचे निर्देश दिले. तसेच क्लेमसाठी अधिक वेळ वाट पाहण्यास लावू नका, असेही नमूद केले आहे. दावा लवकरात लवकर निकाली काढावा, असे सांगितले आहे. कामगार मंत्रालयाने या गोष्टींचा सारासर विचार करत नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली.

ईपीएफ क्लेमबाबत नवे निर्देश कोणते?

कामगार मंत्रालयाने ईपीएफओला सूचनावजा निर्देश दिले असून त्यानुसार क्लेम सेटलमेंट लवकर होईल, याबाबत सजग राहण्यास सांगितले. त्यात त्रुटी असतील किंवा कर्मचार्‍याकडून अर्ज करताना काही उणिवा राहिल्या असतील, तर त्याला लवकर फीडबॅक द्यावा. तसेच चुक दुरुस्ती करून कमीत कमी वेळेत सेटलमेंट करावे. शिवाय नाकारलेल्या प्रस्तावाचा ईपीएफओला आढावा घ्यावा लागेल आणि निश्चित वेळेत दाव्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करावी लागेल.

त्रुटी एकाचवेळी सांगा

नव्या नियमानुसार ईपीएफओला खात्याशी संबंधित असणार्‍या उणिवा, त्रुटी या एकाचवेळी सांगाव्या लागणार आहेत. जेणेकरून दावा वारंवार फेटाळला जाणार नाही. कामगार मंत्रालयाकडे अनेक काळापासून दावा नाकारण्याबाबतच्या तक्रारी येत होत्या. त्याचवेळी दावा नाकारताना त्याचे समाधानकारक उत्तरही दिले जात नव्हते. केवळ एका कारणावरून नकार दिला जात होता. परिणामी, पुन्हा दावा केला तरी तो नामंजूर होण्याची शक्यता अधिक असायची. एका अर्थाने खातेधारकाला एकाचवेळी सर्व अडचणी समजल्या तर त्यात दुरुस्ती करून तो नव्याने क्लेम करू शकेल आणि दावा मंजूर होण्याची शक्यताही अधिक राहू शकेल. एकंदरीत नव्या बदलामुळे सतत दावा नाकारण्याचा मनस्ताप सहन करावा लागणार नाही.

नरेंद्र क्षीरसागर

Back to top button