अर्थवार्ता | पुढारी

अर्थवार्ता

गतसप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकामध्ये अनुक्रमे एकूण 440.95 आणि 1457.38 अंकांची वाढ होऊन दोन्ही निर्देशांक 18065 आणि 61112.44 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टीमध्ये2.05 टक्के, तर सेन्सेक्समध्ये2.44 टक्के वाढ नोंदवली गेली. या सप्ताहात प्रामुख्याने गतसालच्या चौथ्या तिमाहीचे कंपन्यांचे निकाल जाहीर झाले. निफ्टीमधील महत्त्वाच्या कंपन्या जसे की अ‍ॅक्सिस बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, टेक महिंद्रा, मारुती सुझुकी, बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट यांनी संमिश्र निकाल जाहीर केल्यामुळे याचा एकत्रित परिणाम निफ्टी आणि सेन्सेक्स निर्देशांकावर पाहायला मिळाला. आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेची अर्थव्यवस्था मार्च तिमाहीत 1.01 टक्क्याने वाढल्याचे समोर आले. येत्या सप्ताहात अमेरिकेची मध्यवर्ती बैठक आहे. यामध्ये अमेरिकेतील व्याजदर पुन्हा एकदा पाव टक्क्यांनी वाढविले जाण्याची शक्यता अर्थ विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्थेने चालू आर्थिक वर्षाचा भारताचा विकासदर 5.09 टक्क्यांपर्यंत राहण्याचा अंदाज वर्तविला. या सगळ्यांचा एकत्रित परिणाम आणि सेन्सेक्स निर्देशांक वाढ होण्यात झाला.

देशातील महत्त्वाची सिमेंट कंपनी ‘अल्ट्राटेक सिमेंट’चा गत आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीचा नफा तब्बल 32 टक्क्यांनी घटून 1666 कोटीपर्यंत खाली आला. यापूर्वी चौथ्या तिमाही ‘अल्ट्राटेक’चा नफा 24160 कोटी होता; परंतु कंपनीच्या महसूलामध्ये मात्र सुमारे 3000 कोटींची वाढ पाहावयास मिळाली. मागील वर्षी असणारा 15767 कोटींचा महसूल सुमारे 20 टक्क्यांनी वधारून 18662 कोटी झाला. नफा घटण्याचे प्रमुख कारण कच्च्या मालाच्या किमतींमध्ये तसेच ऊर्जा किमतीं(एनर्जी प्रायसेस)मध्ये झालेली वाढ असल्याचे सांगितले जाते.

अदानी सिमेंट कंपनीने स्वत:वरचे 200 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज मुदतपूर्वी फेडले. ‘होलसिम लिमिटेड’ या स्विर्त्झलँडच्या कंपनीचे भारतातील उद्योग खरेदी करण्यासाठी (अंबुजा सिमेंट आणि एसीसी) जागतिक बँकांकडून 1 अब्ज डॉलरचे कर्ज घेण्यात आले होते. जागतिक बँकांकडून एकूण 4.5 अब्ज डॉलर्सचे कर्ज सप्टेेंबर 2024 पर्यंत फेडण्याच्या अटीवर अदानी उद्योग समूहाकडून घेण्यात आले. परंतु ‘अदानी समूहा’कडून मुदतीपूर्व कर्जाची परतफेडसुद्धा झाली आहे.

रेमंड उद्योग समूहाचा ग्राहक सेवा व्यवसाय (कंझ्युमर बिझनेस), गोदरेज, कंझ्युमर प्रॉडक्ट 2825 कोटींना खरेदी केला. रेमंड कंपनीच्या प्रत्येकी रेमंड कंझ्युमर केअर कंपनीच्या प्रत्येकी 4 समभागांच्या बदल्यात 5 गोदरेज कंझ्युमरचे समभाग मिळण्याची शक्यता आहे. रेमंड या कंपनीपासून ‘रेमंड कंझ्युमर केअर’ कंपनी पुढील 12-15 महिन्यांत पूर्णपणे विलग होईल. यासाठी ‘एनसीएलटी’ न्यायाधिकरणाची मंजुरी होणे आवश्यक आहे.

देशातील महत्त्वाची ‘एफएमसीजी’ क्षेत्रातील आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर. कंपनीच्या नफ्यामध्ये सुमारे 9.07 टक्यांची वाढ होऊन नफा 2552 कोटींवर पोहचला. तसेच कंपनीच्या उत्पादनाच्या विक्रीमध्ये 10.06 टक्क्यांची वाढ होऊन महसूल 14893 कोटींवर पोहचला. महागाईत होत असलेल्या वाढीमुळे ग्रामीण भागातील कंपनीच्या व्यवसायावर परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे.
देशातील महत्त्वाची बँक – अ‍ॅक्सिस बँकेच्या गत आर्थिक वर्षाचा चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर. चौथ्या तिमाहीत बँकेला 5728.42 कोटींचा तोटा झाला. ‘सिटी बँके’चा 12489.08 कोटींचा व्यवहार या ताळेबंदात समाविष्ट करण्यात आला. त्यामुळे बँकेला तोटा झाल्याचे दिसत आहे. परंतु हा व्यवहार वगळता बँकेला 6625 कोटींचा नफा झाल्याचे दिसत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हा नफा 61 टक्क्यांनी अधिक आहे, तर मागील तिमाहीच्या तुलनेत हा नफा अधिक आहे. निव्वळ व्याज उत्पन्न (एनआयआय) मागील वर्षीच्या तुलनेत 33 टक्के वधारून 11742 कोटी झाले. बँकेचे अनुत्पादित कर्जांचे प्रमाण 0.80 टक्क्यांनी घटून 2.02 टक्क्यांवर आले. तर निव्वळ अनुत्पादित कर्जाचे प्रमाण 0.39 टक्क्यांवर खाली आले.

दिवाळखोर ‘रिलायन्स कॅपिटल’ कंपनी खरेदी करण्यासाठी हिंदुजा समुहाकडून 26.50 कोटींची बोली. ‘रिलायन्स कॅपिटल’ खरेदी करण्यासाठी ‘हिंदुजा समूह केवळ एकमेव बोलीधारक’(सोल बिडर) ठरला. ‘टोरंट समूह’ आणि?‘ओक ट्री कॅपिटल’ यांनी लिलावातून माघार घेतल्याचे दिसते. रिलायन्स कॅपिटलकडे एकूण 500 कोटींची रोख मालमत्ता आहे. यामुळे ‘रिलायन्स कॅपिटल’च्या लिलावातून कर्जदात्यांना एकूण 10100 कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. लिलावातून एकूण 13000 कोटी मिळण्याची अपेक्षा होती; परंतु यापेक्षा हे मूल्य बरेच कमी आहे.

देशातील महत्त्वाची वाहन उत्पादक कंपनी ‘मारुती सुझुकी’चा गतसालाच्या चौथ्या तिमाहीचा नफा मागील वर्षाच्या तुलनेत थेट 43 टक्के वधारून 2624 कोटी झाला. महसूलातदेखील 20 टक्क्यांची वाढ होऊन महसूल 32048 कोटींवर पोहचला.

नॉन बँकिंग कर्ज पुरवठा. क्षेत्रातील कंपनी बजाज फायनान्सचा गतसालच्या चौथ्या तिमाहीचा नफा 31 टक्यांनी वधारून 3158 कोटी झाला. कंपनीचे निव्वळ व्याज उत्पन्न (एस आय आय)32 टक्के वधारून 7771 कोटी झाले. तसेच एकूण उत्पन्न 31 टक्के वधारून 11363 कोटी झाले. मार्च 2023 च्या तिमाहीत कंपनीच्या व्यवस्थापनअंतर्गत मालमत्ता मूल्य (ए.यू.एम.) 2.47.000 कोटी झाले. कंपनीच्या एकूण अनुत्पादित कर्जाचे प्रमाण 0.94 टक्के, तर निव्वळ अनुत्पादित कर्जाचे प्रमाण 0.34 टक्के झाले.

आयकर विभागाकडून 16 विमा कंपन्यांना कर चुकविल्याप्रकरणी नोटीस पाठविण्यात आल्या. एकूण 5000 कोटींचा ‘जीएसटी’ कर चुकविल्याचा आयकर विभागाचा अंदाज आहे. जुलै 2017 पासून कर चुकविल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामध्ये ‘आयसीआयसीआय प्रू लाईफ’, ‘बजाज आलियान्स लाइफ’ या सर्व 16 कंपन्यांचा समावेश होतो.

‘नेस्ले इंडिया’ कंपनीचा मार्च तिमाहीचा नफा 24.07 टक्के वधारून 737 कोटी झाला. विक्रीमध्येदेखील 21 टक्क्यांची वाढ होऊन विक्री 4831 कोटींवर पोहचली.

‘इंडसइंड बँक’चा चौथ्या तिमाहीचा नफा 46 टक्के वधारून 2046 कोटी झाला. तसेच निव्वळ व्याज उत्पादनामध्ये 17 टक्क्यांची वाढ होऊन निव्वळ व्याज उत्पन्न 4669 कोटींवर पोहचले. एकूण अनुत्पादित कर्जाचे प्रमाण 0.30 टक्क्यांनी कमी होऊन 2 टक्क्यांवर आले. तर निव्वळ अनुत्पादित कर्जाचे प्रमाण 0.64 टक्क्यांवरून 0.59 टक्यांपर्यंत खाली आले.

आयटी क्षेत्रातील जागतिक मंदीचा परिणाम ‘टेक महिंद्रा’च्या निकालावर पाहावयास मिळाला. गतआर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीचा नफा 13.08 टक्क्यांनी घटून 1118 कोटीपर्यंत खाली आला. महसूलामध्येदेखील 0.1 टक्क्यांची घट होऊन महसूल 13718 कोटी झाला.
21 एप्रिल रोजी संपलेल्या सप्ताहात भारताची विदेश चलन गंगाजळी 2.16 अब्ज डॉलर्सने घटून 584.24 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली.

– प्रीतम मांडके (मांडके फिनकॉर्प)

Back to top button