Latest

पहाटेचा शपथविधी; मी डबलगेमच केला : शरद पवार यांची स्पष्ट कबुली

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पहाटेच्या शपथविधीप्रसंगी आपण डबलगेमच केला होता, अशी स्पष्ट कबुलीच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच पहाटेच्या शपथविधीमागील रहस्यस्फोट केला होता. त्यात शरद पवारांनी चर्चेनंतर आम्हा दोघांना (देवेंद्र फडणवीस व अजित पवार) शपथविधीला परवानगी दिली आणि त्यानंतरच सत्ता स्थापण्यासाठी आम्ही पुढे गेलो, असा स्पष्ट गौप्यस्फोट केला होता. या गौप्यस्फोटावर बोलताना गुरुवारी शरद पवार यांनी घूमजाव करीत, सत्तेसाठी आम्ही कोठेही जाऊ शकतो, ही त्यांची पावले समाजासमोर यावीत, म्हणून आपण डबलगेम केल्याचा खुलासा करीत पवारांनी पुन्हा एकदा कात्रज प्रयोगाची कबुलीच दिली आहे.

नोव्हेंबर 2019 मध्ये पहाटेच्या शपथविधीचे नाट्य झाले. तेव्हा पवारांनी रुद्रावतार धारण करीत अजित पवारांवर शरसंधान केले होते. त्यांची कृती पक्षविरोधी असल्याचे सांगितले होते. त्यांच्याबरोबर जे गेले, त्यांनी परत यावे, जे येणार नाहीत, त्यांनी याद राखावी, असा दमही त्यांनी दिला होता. शरद पवार यांनी फडणवीस, अजित पवार यांना परवानगी दिल्याचे गुपित फडणवीस यांनी जाहीर केलेच आहे. पण शपथविधी प्रकरणानंतर वर्षभराने 'ट्रेडिंग पॉवर' हे प्रियम गांधी -मोदी यांचे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. त्यात या घटनेवर भाष्य करताना, शपथविधीआधी शरद पवार आणि अमित शहा यांच्यात गुप्त चर्चा झाली होती, असा दावा करण्यात आला आहे. शरद पवार यांचा दुतोंडी व्यवहार त्यामुळे स्पष्ट झाला आहे.

1978 मध्ये शरद पवार यांनी काँग्रेसचे 40 आमदार फोडून 'पुलोद' सरकार स्थापन केले होते, याची आठवण करून देत फडणवीस यांनी, तुम्ही केली, ती मुत्सद्देगिरी, मग एकनाथ शिंदे यांनी केली ती गद्दारी कशी, असा सवालही उपस्थित केला आहे. पवारांनी काँग्रेस पक्ष फोडला, ती गद्दारीच आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

1978 साली म्हणजे अडतिसाव्या वर्षी पवारांनी ज्येष्ठ नेते वसंतरावदादा पाटील यांना कात्रजचा घाट दाखवला आणि 2019 साली वयाच्या ऐंशीव्या वर्षीही त्यांनी डबलगेम केला. आपल्या खेळीला साळसूदपणे मुत्सद्देगिरीचे लेबल चिकटवताना, इतरांवर मात्र त्यांनी गद्दारीचा शिक्का मारला आहे. आता फडणवीस यांनी गौप्यस्फोट करून पवारांचे सत्य स्वरूप जनतेसमोर आणले आहे. फडणवीस यांच्या गौप्यस्फोटावर पवारांनी केलेल्या शहाजोग खुलाशाने फडणवीसांची नव्हे, पवारांचीच विकेट गेल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

ते का फसले?
पत्र परिषदेत शरद पवार म्हणाले, की फसविले असे ते म्हणत असतील, तर ते फसले का? ते सत्तेशिवाय जगू शकत नाहीत, ते महाराष्ट्रासमोर यायला हवे, यासाठी आम्ही ते केले. माझे सासरे उत्तम गुगली बॉलर होते. मीही क्रिकेट महासंघाचा अध्यक्ष होतो. त्यामुळे गुगली कशी व कोठे टाकायची ते मला माहीत होते. त्यांनी विकेट दिली. त्या शपथविधीने देवेंद्र सत्तेसाठी काय करू शकतात, ते सर्वांसमोर आले.

हे ही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT