पंतप्रधान मोदींनी स्वतःचे कुटुंब तरी कुठे सांभाळले; शरद पवारांचा घाणाघात  
Latest

Sharad Pawar on Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी स्वतःचे कुटुंब तरी कुठे सांभाळले; शरद पवारांचा घाणाघात

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : ज्यांना कुटुंब सांभाळता आले नाही ते महाराष्ट्र काय सांभाळणार, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली होती. त्यांच्या या टीकेला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे (Sharad Pawar on Narendra Modi). "मोदींची कौटुंबिक परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. त्यांच्याबद्दल मला माहित आहे. त्यांनी तरी स्वत:चे कुटुंब कुठे सांभाळले," असा पलटवार पवार यांनी केला आहे. काँग्रेसला या निवडणुकीत दहा-बारा आणि राष्ट्रवादीला आठ-नऊ जागा मिळतील, असा दावा देखील पवार यांनी केला आहे.

संबंधित बातम्या : 

मोदींची कौटुंबिक परिस्थिती चिंताजनक

पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना शरद पवार (Sharad Pawar on Narendra Modi) म्हणाले की, "असं व्यक्तिगत बोलू नये. हे पथ्य पंतप्रधानांनी पाळले नाही. मी हे पथ्य पाळू नये ही माझी भूमिका योग्य राहणार नाही. मला त्यांच्याबद्दल माहित आहे, पण मी त्या स्तरावर जाणार नाही. त्यांची कौटुंबिक परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. त्यांनी स्वतःचे कुटुंब कुठे सांभाळल?" असा सवाल पवार यांनी केला.

मोदी विरूद्ध शरद पवार वादाची पार्श्वभूमी

  • मोदी यांनी शरद पवार यांचा उल्लेख पुण्यातील सभेत भटकती आत्मा असा केला होता.
  • मोदींच्या या टीकेवर शिवसेना प्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले होते. मोदी यांचा उल्लेख त्यांनी वखवखलेला आत्मा असा केला.
  • शरद पवार यांनी माझा आत्मा शेतकऱ्यांसाठी अस्वस्थ असे प्रत्युत्तर दिले होते.

मोदी डॉ. मनमोहन सिंग यांचेच निर्णय राबवतात

पवार म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी जनतेला अनेक अश्वासने दिली होती. पण त्यांनी ती पूर्ण केली नाहीत. त्यांचा स्वभाव फक्त बेछुटपणाने बोलायचा आहे. सरकारची आजची परिस्थिती काय आहे, याचा विचार ते करत नाहीत. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांच्याबद्दलची आस्था कमी होत आहे. मोदींनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या धोरणांवर अनेकवेळा टीका केली. पण आज मनमोहन सिंग यांचेच सर्व निर्णय मोदी राबवतात. लोकांना हे सर्व समजत आहे. म्हणूनच लोक आता मनमोहन सिंग यांची १० वर्ष आणि मोदींची १० वर्ष याची तुलना करत आहेत. मनमोहन सिंग कोणताही गाजावाजा न करता शांत काम करायचे आणि रिझल्ट द्यायचे, हे त्यांचे वैशिष्ट्य होते. मोदींचा रिझल्ट मात्र माहीतच नाही. त्याचा विरोधकांवर टीका करण्यातच फार वेळ जातो, असा टोलाही त्यांनी पंतप्रधान मोदी यांना लगावला.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले होते?

एका खासगी वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांच्याबद्दल ही टीपणी केली होती. "शरदरावांसंदर्भात बोलायचे झाल्यास त्यांची समस्या ही राजकीय नाही. त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला हे कितीही पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी लोकांना ते कसे पटणार? त्यांची ही कौटुंबिक समस्या आहे. हा पूर्णपणे घरातील वाद आहे. काम करणाऱ्या पुतण्याला वारसा द्यायचा की मुलीला? त्यामुळे सहानुभूतीऐवजी असा प्रश्न पडतो की जे या वयात कुटुंबाला संभाळू शकले नाहीत ते महाराष्ट्राला काय संभाळणार?" अशी टीला मोदींनी केली होती.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT