‘त्या’ नेत्यानं अश्वासन देऊनही पाणी पोहोचवलं नाही : पंतप्रधान मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल | पुढारी

'त्या' नेत्यानं अश्वासन देऊनही पाणी पोहोचवलं नाही : पंतप्रधान मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंधरा वर्षांपूर्वी एक मोठा नेता येथे निवडणूक लढवण्यासाठी आला होता. त्यानंतर त्यांनी मावळत्या सूर्याची शपथ घेऊन टंचाईग्रस्त भागात पाणी पोहोचवण्याची शपथ घेतली. पण त्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. आता त्या नेत्याची माढ्यातून लढण्याची हिंमत नाही, त्यांना शिक्षा देण्याची वेळ आली आहे, अशी खरमरीत टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांचे नाव न घेता केली.

सोलापुरातील माळशिरस येथे मंगळवारी (दि.३०) आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या १० वर्षात जेव्हापासून तुम्ही मला कामासाठी निवडले तेव्हापासून मी माझ्या वेळेतील प्रत्येक क्षण तुमच्या सेवेसाठी समर्पित केला आहे. आज देशातील आणि महाराष्ट्रातील जनतेला मोदी सरकारची १० वर्षे आणि काँग्रेस सरकारची ६० वर्षे यातला फरक दिसत आहे. जे काँग्रेस ६० वर्षात करू शकले नाही ते तुमच्या या सेवकाने १० वर्षात करून दाखवले आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

महाराष्ट्रातील लोक जेव्हा प्रेम आणि आशीर्वाद देतात तेव्हा ते कोणतीही कसर सोडत नाहीत. पण जेव्हा कोणी दिलेले आश्वासन पूर्ण करत नाही तेव्हा महाराष्ट्रातील जनता ते लक्षात ठेवते आणि वेळ आल्यावर हिशोबही करते, असा टोला त्यांनी शरद पवार यांना लगावला. २०१४ मध्ये सरकार स्थापन केल्यानंतर मी माझी संपूर्ण शक्ती या सिंचन प्रकल्पांवर केंद्रित केली. काँग्रेसचे प्रलंबित १०० पैकी ६३ प्रकल्प आम्ही पूर्ण केले आहेत. प्रत्येक शेतात आणि प्रत्येक घरात पाणी पोहोचवणे हे माझे ध्येय आहे. विदर्भ असो किंवा मराठवाडा पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी तळमळण्याचे हे पाप वर्षानुवर्षे होत आहे. देशाने काँग्रेसला ६० वर्षे देशावर राज्य करण्याची संधी दिली. या ६० वर्षांत जगातील अनेक देश पूर्णपणे बदलले, पण काँग्रेसला शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवता आले नाही, अशी टीका त्यांनी काँग्रेसवर केली.

काँग्रेसने महाराष्ट्राचा विश्वासघात केला

२०१४ मध्ये, सुमारे १०० सिंचन प्रकल्प होते जे अनेक दशकांपासून प्रलंबित होते. त्यापैकी २६ प्रकल्प महाराष्ट्रातील होते. काँग्रेसने महाराष्ट्राचा मोठा विश्वासघात केला आहे. १० वर्षांपूर्वी रिमोट कंट्रोलचे सरकार असताना महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते कृषिमंत्री होते. इथल्या बलाढ्य नेत्यांनी दिल्लीवर राज्य केले तेव्हा उसाची एफआरपी २०० रुपयांच्या आसपास होती आणि आज मोदींच्या कार्यकाळात उसाची एफआरपी ३५० रुपयांच्या आसपास आहे. गेल्या दशकात शेतकऱ्यांनी भारताला अन्न उत्पादनात स्वावलंबी बनवले आहे. आता आमचा संकल्प विकसित भारताला अन्नपुरवठा करणारा, आणि ऊर्जा पुरवठादार बनण्याचा आहे. विकसित भारत घडवण्यात देशातील महिला शक्तीचा मोठा वाटा आहे. १० वर्षात एक कोटी बहिणी लखपती दीदी झाल्या आहेत. आता ३ कोटी बहिणींना लखपती दीदी बनवणार असल्याची हमी यावेळी पंतप्रधान मोदींनी दिली.

हेही वाचा : 

Back to top button