पुणे; पुढारी वृत्तसेवा : शरद पवार, नितीन गडकरी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, नाना पटोले, जयंत पाटील असे अनेक वरिष्ठ नेते विविध कार्यक्रमांनिमित्त शनिवारी पुण्यात येणार आहेत. त्यामुळे आज दिवसभर शहरात राजकीय धुमशान होणार आहे. सर्वच राजकीय नेते लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले असून, राज्यातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राजकीय फेरमांडणीला सुरुवात झाली आहे.
चांदणी चौक प्रकल्पाच्या उद्घाटनाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. शनिवारी सकाळी होणार्या या कार्यक्रमानिमित्त भाजपचे कार्यकर्ते शक्तिप्रदर्शनाच्या तयारीला लागले आहेत. राज्यातील सत्ताधारी आघाडीतील प्रमुख नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. अजित पवार विद्यापीठ चौकातील कामाचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे मेट्रो, चांदणी चौक प्रकल्पासह विविध विकासकामांना गती देताना सत्ताधारी आघाडी निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे दिसून येते.
मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये साखर कारखाना महासंघाच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित राहणार आहेत. वळसे पाटील मंत्री झाल्यानंतर प्रथमच पवार यांच्यासोबत एका व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. त्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मांजरीमध्येच संभाजी बि—गेडचा दिवसभर कार्यक्रम होणार आहे. संभाजी बि—गेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड संघटनात्मक बांधणीवर बोलणार आहेत.
'महाराष्ट्र धर्म वाचवावा' या विषयावर शरद पवार यांचे भाषण होणार आहे. 'समाजकारणासह राजकारणातील तरुणांचे भविष्य' या विषयावर आमदार रोहित पवार बोलणार आहेत. या कार्यक्रमाकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काँग्रेस भवनात येणार आहेत. तेथे शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांशी ते संवाद साधतील.
काँग्रेस 15 ऑगस्टनंतर राज्यात सर्वत्र पदयात्रा काढणार आहे. त्याची तयारी वेगाने सुरू झाली आहे. महिनाअखेरीला मुंबईत देशातील विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. त्यामुळे काँग्रेसमधील हालचाली गतिमान झाल्या आहेत. अजित पवार सत्ताधारी पक्षांसोबत गेल्याने पुणे शहरातील राजकीय बदलाचा अंदाज नाना पटोले घेणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या हालचालींना वेग आला आहे.
भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांचे नेते व्यूहरचना आखू लागल्याने पुण्यातील राजकीय कार्यकर्ते कामाला लागले आहेत. भाजपने नवीन शहराध्यक्ष नियुक्त केल्यानंतर त्यांच्या सहकार्यांची निवड येत्या आठवड्यात करण्यात येणार आहे. काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसचे कार्यक्रम वाढले असले, तरी त्यांचे पक्षांतर्गत मतभेद लवकर संपविण्याची आवश्यकता असल्याचे मत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जाहीर भूमिका काय मांडणार? याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. त्याची सुरुवात शनिवारी ते करणार का? याची कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे.
हेही वाचा