सातारा : पंतप्रधान दहा वर्षात बोललेले एक तरी सत्य ठरले का? भाई जगताप यांची पीएम मोदींवर टीका | पुढारी

सातारा : पंतप्रधान दहा वर्षात बोललेले एक तरी सत्य ठरले का? भाई जगताप यांची पीएम मोदींवर टीका

कराड ः पुढारी वृत्तसेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजवर अनेक घोषणा केल्या आहेत. ते बोललेले एक तरी मागील दहा वर्षात सत्य ठरले आहे का? असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी केंद्र सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. सातारा लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक आमदार भाई जगताप यांनी शुक्रवारी कराड दक्षिण, कराड उत्तर आणि पाटण या तीन विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांची मते जाणून घेतली. यावेळी आमदार पृथ्वीराज चव्हाण, अ‍ॅड. उदयसिंह पाटील, मनोहर शिंदे, निवासराव थोरात, अजितराव पाटील चिखलीकर, अभिजीत पाटील या प्रमुख काँग्रेस पदाधिकार्‍यांसह तिन्ही मतदारसंघातील कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार जगताप पत्रकारांशी बोलताना म्हणाले, मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस नंबर एकचा पक्ष ठरेल आणि महाविकास आघाडीची महापालिकेवर सत्ता येईल. त्याचबरोबर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व ४८ मतदारसंघातील कार्यकर्त्यांच मते जाणून घेण्याची प्रक्रिया काँग्रेसमध्ये सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आपण सातारा लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली आहेत. मतदारसंघातील कार्यकर्त्यांची मते जाणून घेत पक्ष श्रेष्ठींना १५ ऑगस्टपर्यंत आपण अहवाल सादर करणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्यापुढे एकही विरोधक नाही असे म्हणतात, मात्र त्याच नसलेल्या विरोधकांनी चार राज्यात सत्ता काबीज केली आहे. तर विश्वगुरूंच्या पक्षाची सत्ताही चारच राज्यात आहे, असेही आमदार भाई जगताप म्हणाले.

हेही वाचलंत का?

Back to top button