बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : दीड महिन्यानंतर बारामतीत मुक्कामी आलेले ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटण्यासाठी सकाळपासूनच त्यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी कार्यकर्त्यांची रिघ लागली आहे. २५ जून पासून पवार कुटुंबियातील प्रमुख राजकीय व्यक्ति असलेल्यांपैकी कोणीही बारामतीत नव्हते. २५ जूनला बारामतीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव कार्यक्रमाला कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या बारामतीत आले होते. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते शरद पवार, तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या उपस्थित होत्या.
त्यानंतर आठवडाभरातच अजित पवार हे सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर राष्ट्रवादीत राजकीय उलथापालथ झाल्याचे पाहायला मिळाले. या उलथापालथीनंतर या तिन्ही प्रमुख नेत्यांपैकी कोणीही बारामतीला आलेले नव्हते. रविवारी (दि. १३) सोलापूर, सांगोला दौरा आटोपून रात्री नऊच्या सुमारास शरद पवार हे गोविंदबाग या निवासस्थानी दाखल झाले. पवार आल्याचे समजताच सोमवारी सकाळपासूनच कार्यकर्ते त्यांना भेटत आहेत. दीड महिन्यांच्या कालावधीनंतर गोविंदबाग फुलून गेल्याचे चित्र दिसून आले.
हेही वाचा