सांगली : मोफत आरोग्य योजनेतून ‘सिव्हिल’ वंचित | पुढारी

सांगली : मोफत आरोग्य योजनेतून ‘सिव्हिल’ वंचित

अंजर अथणीकर

सांगली : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारितील रुग्णालये, आरोग्य केंद्रातून मोफत वैद्यकीय चाचण्या आणि उपचारांचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याची अंमलबजावणी दि.15 ऑगस्टपासून करण्यात येत आहे. यामध्ये सांगली, मिरजेतील शासकीय रुग्णालयाचा समावेश नसल्यामुळे मोठ्या संख्येने लाभार्थी यापासून वंचित राहणार आहेत. दुसर्‍या बाजूला महापालिका रुग्णालयांचा यामध्ये समावेश करण्यासाठी अद्याप शासकीय अद्यादेश न आल्यामुळे याबाबत संभ्रमावस्था आहे. या योजनेत प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय आणि नगरपालिका, उपजिल्हा रुग्णालयांचा या योजनेत समावेश करण्यात आल्याने जिल्ह्यातील 99 रुग्णालयात याचा रुग्णांना लाभ मिळणार आहे.

प्रत्येक नागरिकाला चांगल्या आरोग्यासाठी निःशुल्क, दर्जेदार, सहज व विनाविलंब वैद्यकीय सेवा देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रुग्णालयातून निःशुल्क उपचाराचा लाभ देण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. यामुळे अगदी केस पेपरपासून विविध चाचण्या, औषधोपचार पूर्ण मोफत होणार आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत येणारी रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांना हा निर्णय लागू करण्यात आला नसल्यामुळे सांगली-मिरजेतील शासकीय रुग्णालयात याचा रुग्णांना लाभ देण्यात येणार
नाही. याठिकाणी रोज सुमारे आठशे रुग्ण लाभ घेत असतात. त्याचबरोबर हे हॉस्पिटल 705 खाटांचे आहे. महापालिका क्षेत्रातील रुग्णालयांना याचा लाभ होणार नाही, याबाबत अद्याप संभ्रमावस्था आहे. महापालिकेला याबाबत अजूनही शासनाचा आदेश आलेला नाही.

महापालिकेतील 19 आरोग्य केंद्राला आदेश नाहीत

महापालिका क्षेत्रात आरोग्य केंद्र, आयुर्वेदिक, प्रसुतिगृहे, डायग्नोस्टिक सेंटर असे सुमारे तीस आरोग्य केंद्रे आहेत. या ठिकाणी मोफत उपचारासाठी अजूनही आदेश आलेले नाहीत. या ठिकाणी नाममात्र शुल्क आकारले जाते. महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. वैभव पाटील यांनी सांगितले की, याबाबत शासनाचा आदेश अजून आलेला नाही. आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल.

जनआरोग्य योजनेची होणार दीड महिन्यात अंमलबजावणी

आयुष्यमान भारत योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजना या योजनेंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतच्या आरोग्य खर्चाची हमी सरकारने यापूर्वीच घेतली आहे. या योजनांमधून सर्व नागरिकांना आरोग्य खर्चाचे कवच उपलब्ध करून दिले आहे. या जनआरोग्य योजनेची जिल्ह्यात आगामी दीड महिन्यात अंमलबजावणी होणार आहे.

येथे सेवा मिळणार

प्राथमिक आरोग्य केंद्रे : 64
ग्रामीण रुग्णालये : 15
उपजिल्हा रुग्णालये : 2
नगरपालिका रुग्णालये : 18

मोफत आरोग्य योजनेचा अध्यादेश मिळाला असून, आम्ही जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयात 15 ऑगस्टपासून मोफत उपचार करणार आहे. वर्षाकाठी या ठिकाणाहून सुमारे 50 लाखाचा निधी मिळत होता, तो आता बंद होणार आहे. जवळपास दोन हजार रुग्ण या ठिकाणी उपचार घेतात.
– डॉ. दिलीप माने,
जिल्हा आरोग्याधिकारी

Back to top button